घरफिचर्ससारांशपावसाळ्यातले पारंपरिक अन्नपदार्थ...

पावसाळ्यातले पारंपरिक अन्नपदार्थ…

Subscribe

पावसाळ्यातल्या तिखट पदार्थात लसूण आणि आले किंवा मिरी, दालचिनी, तमालपत्रे, लवंगा...हे मसाले चवीसाठी आवश्यकच असतात. तसं म्हटलं तर पावसाळ्यात श्रावण येईपर्यंत कर्नाटक बेंदूर/ पोळ्याशिवाय फारसे सण नसतात. त्यावेळी मोठाले शंकरपाळे म्हणजे कापण्या आणि बैलांच्या कानात घालायला दूध गूळ घातलेली कडबोळी करतात. पण ऐन पावसाळ्यातले गोड पदार्थ म्हणजे गरमागरम शेवयांची खीर, गूळपापडीच्या वड्या, सांज्याच्या पोळ्या आणि हळदीच्या पानातले पातोळे, काकडी, फणसाची सांदणे, खांतोळ्या, कांदेपाक किंवा उन्हाळ्यात घातलेले मुरांबे..यासारखे साधेसुधे असतात.

  • मंजुषा देशपांडे 

हा लेख लिहिताना, मला आठवतोय तो चाळीस वर्षांपूर्वी केलेला पावसाळी ट्रेक..ऐनारीच्या घनदाट जंगलातला. गगनबावडा ओलांडून पुढे करूळ घाटात गेले की रिंगेवाडी फाट्यापासून उजवीकडे जंगल वाटेने चालत गेले की ऐनारी. तिथे बकासूराचा वाडा आहे असे ऐकल्यामुळे ऐन पावसाळ्यात आम्ही काही जण तिथे गेलो होतो. त्या किर्र जंगलातून…डोंगरात वाटा काढत बकासूराच्या गुहेत जाऊन येईपर्यंत चांगलीच संध्याकाळ झाली. मग पावसाचा जोर वाढलेला असल्यामुळे तिथल्या सरपंचाकडे मुक्काम ठोकला. भिजक्या कोंबड्यासारखे आम्ही पाचजण त्यांच्या काळोख्या स्वैपाकघरात, चुलीच्या उबेला बसलो होतो. त्या घरात तेव्हा वीजही नव्हती.

त्या सरपंचाच्या घरमालकिणीने आमच्यासाठी फणसाच्या आठळ्यांचे तिखट जाळ पिठले, आणि चुलीवरच्या गरमागरम नाचणीच्या भाकरी, लाल तांदळाचा मऊ भात…आणि गूळ घालून उकडलेल्या जाड शेवया! असे जेवण रांधलेले होते. अहाहा…काय ती स्वर्गीय चव! खरे तर भूक खवळली की कसलेही अन्न गोडच लागतेच. पण त्या अन्नाची चव खरोखरच छान होती.

- Advertisement -

असेच आम्ही एकदा पावसाळ्यातला ’खवळलेला समुद्र’ पहायची हौस म्हणून वेंगुर्ल्याजवळच्या सागरतीर्थाला गेलो होतो. तिथेही अशाच एका भल्या माणसाच्या घरात जेवलो. आमच्यातल्या एका मत्स्याहार्‍यासाठी त्यांनी चुलीतल्या राखेत सुका बांगडा भाजला होता. तो भात आणि मासे खाऊन तृप्त झाला होता. आमच्यासाठी मात्र त्यांनी खोबरेल तेलातली तांबड्या मिरच्यांची फोडणी दिलेली आणि भरपूर ओला नारळ, तिरफळ आणि लसूण घातलेली कुळथाची पिठी, तांदळाच्या भाकरी, भात, कोकमाचे तिवळ आणि फणसाचे पापड..असे जेवण बनवले होते. अहाहा..!. खरे तर त्या दिवशीही ओल्या कंच वाळूत फिरून आणि समुद्राच्या पाण्यात आणि पावसात भिजून ..पोट नुसते खवळले होते. गरमागरम तांदळाची भाकरी आणि पिठले पोटात पडताच..जीव असा काही थंडावला होता की बस! त्या जेवणाची चव मला अजूनही विसरता येत नाही.

वास्तविक अनेक गावांमध्ये, पाऊस पडला की गावच्या नद्या नाल्यांना पूर येतो आणि त्यांचा जगाशी संपर्क तुटतो. तिथल्या बाजारात काहीच मिळत नाही आणि शेतात काही उगवलेले नसते. अशा वेळी बेगमीच्या पदार्थांवरच पावसाळा काढावा लागतो. पण जातीच्या सुगरणी, तशाही परिस्थितीत चवदार आणि पावसाळ्यातल्या आजारांना दूर ठेवण्यासाठी एकापेक्षा एक भारी पदार्थ बनवतात. विशेषत: पावसाळ्यातल्या खास भाज्या किंवा आज आपण वन डिश मिल म्हणून बनवत असतो तसे पदार्थ म्हणजे पावसाळ्यातल्या रात्रीच्या जेवणांची खासियत असते. पावसाळा सुरू झाला की रानभाज्या उगवतात.

- Advertisement -

कुर्डु, तरोटा, टाकळी, कावळा, कोर्ला, कुडा, भारंगी, दिंडा, शेवळे, कोवळे बांबू, करटोली…एकापेक्षा एक चवदार भाज्या असतात. त्या भाज्या चांगल्या धुवून रात्रभर कापडात गुंडाळून ठेवतात म्हणजे त्यातली विषद्रव्ये निघून जातात अशी खेडोपाड्यात समजूत असते. दुसर्‍या दिवशी लसूण, मिरची वाटून आणि भिजवलेली तुरीची, मुगाची किंवा हरभर्‍याची डाळ घालून भाजी केली की त्याबरोबर साधी भाकरीही पंचपक्वान्नांपेक्षा गोड लागते. यातल्या करटोल्याच्या तर किती प्रकारच्या भाज्या करतात. करटोल्यात बेसनाचे सारण घालून अर्धवट उकडतात आणि सुके खोबरे, खसखस, तिखट, चिंच आणि गूळ घालून रस्सा करतात त्यात ती भरलेली करटोली सोडतात. ही भाजी, पोळी -भाकरी शिवाय नुसती खायलाही मजा येते.

नाशिकजवळ एक देवबांध म्हणून गाव आहे. एकदा त्या गावातून एका आदिवासी पाड्यात गेलो होतो. तिथे पावसाळ्यात खाजकुयलीची पातळ भाजी (खरे तर सार किंवा कढी) आणि नागलीची भाकरी खाल्ली होती. खाजकुयलीची भाजी अतिशय चवदार असते. मात्र तिचे काटे जाण्यासाठी तिला उकळत्या पाण्यात खळबळावी लागते. मुळात ती भाजी गोळा करतानाही जाड किंवा पोत्याच्या कापडाला धरून उपटतात नाही तर तिचे जहरीले काटे किती तरी दिवसपर्यंत अंगाला खाजतात. त्या भाजीला मीठ, मिरचीसुध्दा फार घालावी लागत नाही. पण भाजीला थोडा दाटसरपणा येण्यासाठी कोणत्याही डाळीचे पीठ लावतात. ही भाजी पावसाळ्यात उद्भवणार्‍या दम्यावर आणि संधीवातावर अक्सिर इलाज आहे, असे आता सिध्दही झालेले आहे.

त्याचबरोबर अनेक ठिकाणी लसूण आणि काळ्या मसाल्याची मसूर डाळीची दाट आमटी, पेज-लोणचे, कडधान्यांचे कळणे आणि भात, डाळीच्या सांडग्यांची, पापडाची आमटी, कढी गोळे, वरणफळे, तुरीच्या डाळीची फोडणीची खिचडी, मुगाची खिचडी, भोपळीच्या पानांची किंवा काकडीची थालीपिठे, आमटीतले शेवग्याचे वडे, चकोल्याची आमटी असे कितीतरी पदार्थ पावसाळ्यातल्या जेवणासाठी बनतात. या सगळ्यात मला अधिक आवडते ती म्हणजे डूबक वड्यांची आमटी. खरे तर ही आमटी, हे खानदेशाचे वैशिष्ठ्य, प्रथिनयुक्त अशी ही आमटी…अगदी पहिला घास घेताच..नाका तोंडातून पाणी काढून डोक्यातली सगळी किल्मिषेही काढून टाकते. खानदेशी गरम मसाला, भाजलेला कांदा, खोबरे, आले, लसूण, तिखट, कोथिंबीर यांचा रस्सा बनवायचा आणि बेसनाच्या पिठात तेल, तिखट, मीठ, जिरे ओवा घालून भज्याच्या पीठापेक्षा थोडे घट्ट भिजवायचे. काहीजण या पीठात चिमूटभर खायचा सोडाही घालतात, पण आवश्यकता नसते. आमटी चांगली उकळली की त्यात चमच्याने किंवा हाताने, त्या भिजवलेल्या पीठाच्या भज्यासारख्या डूबक वड्या सोडायच्या. डूबक वड्या फुगून चांगल्या मोठ्या होतात आणि ती आमटी चवीला तर अप्रतिम लागतेच वर पौष्टिकही असते.

पावसाळ्यातल्या तिखट पदार्थात लसूण आणि आले किंवा मिरी, दालचिनी, तमालपत्रे, लवंगा…हे मसाले चवीसाठी आवश्यकच असतात. तसं म्हटलं तर पावसाळ्यात श्रावण येईपर्यंत कर्नाटक बेंदूर/ पोळ्याशिवाय फारसे सण नसतात. त्यावेळी मोठाले शंकरपाळे म्हणजे कापण्या आणि बैलांच्या कानात घालायला दूध गूळ घातलेली कडबोळी करतात. पण ऐन पावसाळ्यातले गोड पदार्थ म्हणजे गरमागरम शेवयांची खीर, गूळपापडीच्या वड्या, सांज्याच्या पोळ्या आणि हळदीच्या पानातले पातोळे, काकडी, फणसाची सांदणे, खांतोळ्या, कांदेपाक किंवा उन्हाळ्यात घातलेले मुरांबे..यासारखे साधेसुधे असतात.

खरे तर आज आपल्यासारख्या शहरी लोकांना, सर्व हंगामात कोणत्याही वस्तू विनासायास मिळतात. पण डोंगराळ आणि शहरांपासून दूर रहाणार्‍यांचे पावसाळ्यात खाण्याचे खरोखरच हाल होतात. तिथली मुले, माणसे शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात. त्यांनी त्यांच्या गावात, पावसाळ्यात खाल्लेल्या किंवा खावे लागलेल्या अन्नाच्या आठवणी काही सुखद नसतात. काही ठिकाणी घरांमध्ये पावसाळ्यात, भाकरी करण्याइतकेही पुरेसे पीठ नसते. पीठ असले तरी शेतातल्या कामातून स्वैपाक बनवायला फुरसतही नसते. अशावेळी, नाचणी, ज्वारीच्या पीठाची लापशी, सूंठ घातलेले मुगाचे माडगे किंवा मक्याचे दाणे भरडून ताकातला ठोंबरा केला जातो. ठोंबरा नीट शिजला नसेल तर तो खाताना हिरड्या सोलवटून निघतात. त्यावेळच्या उपासमारीच्या आठवणीने, त्या लोकांचे पाणावलेले डोळे मी अनेकदा पाहिलेले आहेत.

अर्थातच आपल्याला आज निवडीला भरपूर वाव असतो म्हणून आणि वेगळ्या चवीचे म्हणूनही हे सगळे पारंपरिक पदार्थ आपल्याला आवडतात. आपल्याला ते पदार्थ मूळ पाककृतीमध्ये थोडे बदल करूनही बनवता येतात. उदाहरणार्थ मक्याच्या बारीक पीठाचा चांगला शिजवलेला मक्याचा ठोंबराही खरोखरच छान लागतो. त्यात पास्टा किंवा नुडल्स घातले की भन्नाट चव येते. अगदी खाजकुयलीचे सूपसुध्दा खरोखरच लाजवाब लागते. निदान खाजकुयली उकडून गाळलेल्या पाण्याचा उपयोग कोणतेही सूप बनविण्यासाठी करता येतो.

पावसाळ्यातले हे सर्व पारंपरिक पदार्थ पचायला हलके, पावसाळ्यातल्या औदासिन्यावर मात करण्यासाठी आणि अनेक साथीच्या आजारांवर परिणामकारक प्रतिबंध म्हणून.. खरोखरच अतिशय उपयुक्त आहेत. एवढ्या गुणी पण काळाच्या रेट्यात केवळ न्यूनगंडापायी मागे राहिलेल्या पदार्थांना, खाद्यसंस्कृतीच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळवून देणे, ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -