घरदेश-विदेशभारतीय सशस्त्र दलात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या 'या' 6 योद्ध्या

भारतीय सशस्त्र दलात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ‘या’ 6 योद्ध्या

Subscribe

भारतात महिलांना शक्तीचे रुप मानले जाते. शत्रुंपासून देशाचे रक्षण करण्याबरोबरचं ही स्त्री त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. अलीकडच्या काळात भारताच्या सशस्त्र दलात महिलांची संख्या झपाट्याने वाढतेय. गेल्या काही वर्षांपासून भारत सशस्त्र दलात लिंगभेद न करता महिलांना लष्कर, नौदल, हवाई अशा तीनही दलात काम करण्यास प्रोत्साहन देत आहे.

फेब्रुवारी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी घोषणा केली की, भारतीय सशस्त्र दलांच्या सर्व विभागांमध्ये महिलांना प्राधान्य दिले जाईल, यामुळे भारतीय संरक्षण दलात महिलांचा दबदबा वाढत आहे. या स्वातंत्र्यदिनी देशाच्या संरक्षण दलात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या काही प्रतिष्ठीत महिलांची माहिती देणार आहोत.

- Advertisement -

1. पुनिता अरोरा

लेफ्टनंट जनरल पुनिता अरोरा या भारतीय सशस्त्र दलाच्या लेफ्टनंट आणि भारतीय नौदलाच्या पहिल्या व्हाईस अॅडमिरल बनलेल्या भारतातील पहिल्या महिला आहेत. त्यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1932 रोजी पाकिस्तानच्या लाहोर प्रांतात झाला. मात्र भारत – पाक फाळणीदरम्यान त्या अवघ्या 12 वर्षांच्या असताना कुटुंबियांसोबत भारतात आल्या. यानंतर त्यांचे कुटुंबीय उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे स्थायिक झाले. सहारनपूरच्या सोफिया स्कूलमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी गुरु नानक गर्ल्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अकारावीत करिअर म्हणून सायन्स विषय निवडला. त्यानंतर पुनिता अरोरा यांनी 1963 मध्ये पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

- Advertisement -

2004 मध्ये भारतीय नौदलात लेफ्टनंट जनरल पदावर पोहोचणाऱ्या पुनिता अरोरा या पहिली भारतीय महिला होत्या. त्यांनी 36 वर्षे नौदलात सेवा बजावली आणि या काळात त्यांना एकूण 15 पदके मिळाली. कालूचक हत्याकांडातील पीडितांना कार्यक्षम आणि वेळेवर मदत केल्याबद्दल त्यांना 2002 मध्ये विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. यानंतर त्यांना 2006 मध्ये परम विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.

2. पद्मावती बंदोपाध्याय

डॉ. पद्मावती बंदोपाध्याय या भारताच्या पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल आहेत. उत्तर ध्रुवावर वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांची आणखी एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

पद्मावती बंदोपाध्याय 1968 मध्ये IAF मध्ये सामील झाल्या आणि 1978 मध्ये त्यांचा डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज कोर्स पूर्ण केला, असे करणाऱ्या त्या पहिली महिला अधिकारी बनल्या. 1971 च्या भारत-पाक संघर्षादरम्यान त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना एअर व्हाईस मार्शल पदावर पदोन्नतीसह ‘विशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.

1973 मध्ये त्यांना विशिष्ट सेवा पदक आणि 1991 मध्ये AFHA पुरस्कार मिळाला. पद्मावतीला 2020 मध्ये भारत सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

3. मिताली मधुमती

मिताली मधुमती हे भारतीय लष्करातील एक लोकप्रिय नाव आहे. 2010 मध्ये मिताली मधुमती भारतातील पहिल्या महिला अधिकारी बनल्या, जिथे त्यांना त्यांच्या शौर्याबद्दल शौर्य पुरस्कारने सन्मानित करण्यात आहे. 26 फेब्रुवारी 2010 रोजी लेफ्टनंट कर्नल मिताली मधुमिता यांना अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय दूतावासावरील हल्ल्यादरम्यान दाखवलेल्या धैर्याबद्दल सेना पदक प्रदान करण्यात आले.

लेफ्टनंट कर्नल मधुमिता यांनी भारतीय दूतावासात जाऊन जखमी नागरिक आणि लष्करी जवानांची ढिगाऱ्यातून सुटका केली. मात्र, हा हल्ला अत्यंत जीवघेणा होता, ज्यात 19 जणांना आपला जीव गमवावा लागला. मात्र अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासावर झालेल्या हल्ल्यात मधुमिताने 17 जणांचे प्राण वाचवले.

4. दिव्या अजित कुमार

वयाच्या 21 व्या वर्षी दिव्या अजित कुमार यांनी 244 सहकारी कॅडेट्सचा (पुरुष आणि महिला दोन्ही) पराभव करून सर्वोकृष्ट ऑल- राऊंड कॅडेट पुरस्कार जिंकला आणि सन्मानाची स्वॉर्ड ऑफ ऑनर मिळवला. ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीच्या एका कॅडेटला दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

कॅप्टन दिव्या अजित कुमार भारतीय लष्कर AAD च्या अधिकारी आहेत. तसेच त्या ओटीए (ऑफिसर ट्रेनिंग अकादमी) चेन्नईमधून उत्तीर्ण झाली. प्रजासत्ताक दिन 2015 च्या परेडमध्ये त्यांनी 154 महिला अधिकारी आणि कॅडेट्सच्या सर्व महिला संघाचे नेतृत्व केले, जेथे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा देखील उपस्थित होते. कॅप्टन दिव्या अजित कुमारचा जन्म चेन्नईतील तामिळ कुटुंबात झाला. त्यांच्या घरातील त्यांच्या पिढीतील त्या पहिल्या लष्करी अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण चेन्नई येथे पूर्ण झाले आणि पुढील शिक्षण चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून पूर्ण केले. त्या एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) मध्ये सामील झाल्या, ज्यामुळे तिला भारतीय सैन्यात सामील होण्याची प्रेरणा मिळाली.

5. निवेदिता चौधरी

फ्लाइट लेफ्टनंट निवेदिता चौधरी भारतीय वायुसेनेतील (IAF) माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला आणि पराक्रम गाजवणाऱ्या राजस्थानमधील पहिली महिला ठरल्या. राजस्थानच्या झुंझुनूं जिल्ह्यातील मुकुंदगड येथील रहिवासी असलेल्या निवेदिता चौधरी ऑक्टोबर 2009 मध्ये आग्रा येथे स्क्वाड्रनमध्ये सामील झाल्या होत्या.

शाळेत एनसीसी कॅडेट म्हणून शिक्षण पूर्ण करून कॉलेजमध्ये पोहोचल्यावर निवेदिता तिथल्या एनसीसीमध्ये दाखल झाल्या आणि एअर विंगमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात त्यांची हवाई दलात निवड झाली.

6. प्रिया सेमवाल

सशस्त्र दलात अधिकारी म्हणून सामील झालेल्या प्रिया सेमवाल यांचे पती नाईक अमित शर्मा 20 जून 2012 रोजी अरुणाचल प्रदेशमधील ऑपरेशन ऑर्किडमध्ये शहीद झाले. पतीच्या हौतात्म्यानंतर त्यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये एक तरुण अधिकारी म्हणून त्याला लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग (EME) मध्ये सामील करण्यात आले.

देहराडून येथील मेजर प्रिया सेमवाल या लष्कराच्या महिला अधिकाऱ्यांच्या चेन्नई ते विशाखापट्टणम या पहिल्या नौकानयन मोहिमेचा एक भाग आहेत. मेजर प्रिया याआधी पश्चिम बंगालमधील हल्दिया ते गुजरातमधील पोरबंदर दरम्यानच्या आर्मी सेलिंग एक्सपीडिशनचा भागही होत्या. त्यानंतर 50 सदस्यांच्या ताफ्याने 45 दिवसांत समुद्रातील 3500 नॉटिकल मैल अंतर कापले होते.


हेही वाचा : Independence Day 2022: भारताच्या राजकारणातील रणरागिणी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -