घरताज्या घडामोडीलोकसभेच्या निवडणुका झाल्यास भाजप-शिंदे गटाला बसणार धक्का!, एका सर्वेक्षणाचा निष्कर्ष

लोकसभेच्या निवडणुका झाल्यास भाजप-शिंदे गटाला बसणार धक्का!, एका सर्वेक्षणाचा निष्कर्ष

Subscribe

महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर लोकसभेच्या आगामी निवडणुका आज झाल्या तर भाजप-शिंदे गटाला जबर धक्का बसण्याची शक्यता एका सर्वेक्षणाच्या निकालातून समोर आली आहे. २०२४ च्या निवडणुकांकडे मुख्यत्वे भाजपचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेला संपवून शिंदे गटाच्या सहाय्याने राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकहाती जिंकण्याचा भाजपचा मानस आहे. राज्यातील राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकडे लागलं आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुका झाल्या तर मतदार कोणाला आपला कौल देतील?, याबाबतची आकडेवारी समोर आली आहे.

महाराष्ट्रातून यूपीएला ३० आणि एनडीएला १८ जागा

- Advertisement -

महाराष्ट्र आणि बिहारमध्ये झालेल्या सत्तानाट्यानंतर इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी मुड ऑफ द नेशन या नावाने एक सर्व्हे केला आहे. जर लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर महाराष्ट्रातून यूपीएला ३० आणि एनडीएला फक्त १८ जागा मिळतील, असा अंदाज इंडिया टुडे सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये मांडण्यात आला आहे. म्हणजेच शिंदे गट-भाजपला महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत धक्का बसणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे.

मागील महिन्यात जनतेचा कौल काय?

- Advertisement -

जुलै महिन्यात महाराष्ट्रातील जनता आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या पाठीशी उभी असल्याचे सर्वेक्षण इंडिया टीव्ही या हिंदी वृत्तवाहिनीने केले होते. जुलै महिन्यात जर लोकसभेची निवडणूक झाली असती तर ४८ जागांपैकी नरेंद्र मोदी (भाजप) २६ जागा जिंकू शकतात. तर उद्धव ठाकरे (शिवसेना) यांना ३, एकनाथ शिंदे (शिंदे समर्थक शिवसेना) ११, शरद पवार (राष्ट्रवादी) ६ आणि राहुल गांधी (काँग्रेस) यांना २ जागा मिळू शकतात, असं सर्वेक्षण या वृत्तवाहिनीने केले होतं. मात्र, आज समोर आलेल्या सर्वेक्षणातून भाजप-शिंदे गट निवडणुकीत ढासळणार असल्याचं चित्र समोर आलं आहे. त्यामुळे शिंदे गट-भाजपची रणनिती काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बिहारच्या सत्तांतरानंतर चित्र बदललं

१ ऑगस्टपर्यंत लोकसभा निवडणुका झाल्या असत्या तर एनडीएला ५४३ पैकी ३०७ जागा मिळाल्या असत्या. तसेच युपीएला १२५ आणि इतर पक्षांना १११ जागा मिळाल्या असत्या. बिहारच्या सत्तांतरानंतर मात्र हे चित्र बदललं आहे. बिहारमध्ये नितीश कुमारांनी भाजपची साथ सोडल्यानंतर भाजपच्या २१ जागा कमी होत आहेत.

भाजप आणि शिवसेनेने २०१९ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४२ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, राज्यातील सत्तांतरानंतर सेनेचे आमदार आणि १२ खासदारही भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे ६ खासदार शिल्लक आहे. शिंदे गट आणि भाजपच्या खासदारांची एकूण संख्या ३६ इतकी आहे. मात्र, तातडीने निवडणुका झाल्यास हा आकडा १८ जागापर्यंत खाली घसरुण भाजपच्या ५० टक्के जागा कमी होऊ शकतात. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती बऱ्याच अंशी बदलू शकते.

पंतप्रधानपदीच्या दावेदारासाठी भाजपचे हे नेते आघाडीवर

नरेंद्र मोदी हे देशाचे आतापर्यंत सर्वोत्तम पंतप्रधान आहेत. त्यांनी अनेक विदेश दौरे करून इतर देशांसोबत चांगले संबंध ठेवले आहेत. अनेक डीलही केले आहेत. त्यामुळे या देशांचा भारताला उत्तम असा पाठिंबा आहे. पीएम मोदी हे उत्कृष्ट पंतप्रधान असल्याचं ४४ टक्के लोकांचं मत आहे. तर १७ टक्के अटलबिहारी वाजपेयी, १३ टक्के इंदिरा गांधी आणि ८ टक्के लोकांनी मनमोहन सिंग यांना सर्वोत्तम पंतप्रधान मानलं आहे.मात्र, पंतप्रधानपदीच्या दावेदारासाठी अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी हेही इतरांना धोबीपछाड देऊ शकतात असा एक तर्क मांडला जातो.


हेही वाचा : अरबी समुद्रात बुडाले भारताचे जहाज; पाकिस्तानच्या नौदलाने वाचवला 9 क्रू मेंबर्सचा जीव


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -