घरमहाराष्ट्रमुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, मध्य रेल्वे विस्कळीत, रस्ते मार्गही जलमय; प्रवाशांचे...

मुंबई, ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, मध्य रेल्वे विस्कळीत, रस्ते मार्गही जलमय; प्रवाशांचे हाल

Subscribe

ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने आता जोरदार बरसात सुरू केली आहे. आज सायंकाळी चार वाजल्यापासून मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस झाला. त्यामुळे रस्ते जलमय झाले आहेत. तसंच, कामावरून घरी जाणाऱ्या नोकरदारवर्गालाही यामुळे फटका बसला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली असून मुलुंड, भांडू, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि घाटकोपर स्थानकावरील रुळांवर पाणी साचल्याने लोकलसेवा उशिराने धावत आहे.

पावसामुळे मध्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, कर्जत, कसारापर्यंत धावणाऱ्या रेल्वे १० -१५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत, असं ट्वीट मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे. मात्र, प्रत्यक्षात मध्य रेल्वे अर्ध्या तासांहून अधिक उशिराने धावत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

- Advertisement -

पश्चिम मध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील ४-५ दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता. वायव्य भारतातील मैदानी भागात पुढील 5 दिवसांत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे, असं होसाळीकर म्हणाले. तसंच, महाराष्ट्रात येत्या ५ दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उद्यापासून कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

तसंच, येत्या तीन ते चार तासांत मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पुन्हा तुफान पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबदारी घेत प्रवास करण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

- Advertisement -

रस्ते मार्गही जलमय

पूर्व मुंबई उपनगर परिसरात पाऊस पडल्याने सकल भागातही पाणी साचलं आहे. नागरिकांच्या घरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. भांडूपमधील कोकण नगर, सह्याद्री नगर, बुद्ध नगर, पठाण तबेला येथे पाणी साचलं असून अंधेरी सबवे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सबवेमध्ये २ ते ३ फूट पाणी साचलं असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -