घरमहाराष्ट्रनाशिकपालकमंत्रीपद जाताच झेडपीत छगन भुजबळ झाले परके

पालकमंत्रीपद जाताच झेडपीत छगन भुजबळ झाले परके

Subscribe

किरण कवडे । नाशिक

येवला तालुक्यातील अंदरसूल गावात गोबरधन प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते येत्या शनिवारी (दि.1) होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाची रुपरेषा ठरवताना या मतदारसंघाचे आमदार तथा माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना विश्वासात न घेतल्यामुळे गावकर्‍यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीसह अधिकार्‍यांची कोंडी झाली आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान (टप्पा-दोन) अंतर्गत गावातील घनकचर्‍याचे व्यवस्थापन करण्यासाठी गोबरधन ही योजना सुरु केली आहे. शेण, ओला कचरा, हॉटेलमधील उरलेले अन्न व बाजार समितीमधील ओल्या कचर्‍यापासून बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प अंदरसूल गावात साकारला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 40 लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या 1 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 4 वाजेला या गावातच होणार आहे. केंद्र सरकारचा प्रकल्प असल्यामुळे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन व्हावे, ही ग्राम पंचायतीची भूमिका अतिशय योग्य मानली जाते. तसेच माजीमंत्री तथा आमदार छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ असल्यामुळे त्यांनाही या कार्यक्रमाचे रितसर आमंत्रण मिळणे अपेक्षित होते. परंतु, जिल्हा परिषदेतील संबंधित अधिकारी व प्रशासनाने सर्वप्रथम केंद्रीय मंत्री डॉ.पवार यांची वेळ घेवून हा कार्यक्रम निश्चित केला. ठरलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी प्रशासन अधिकारी भुजबळांकडे पोहोचले. मात्र, त्यांना दुसरीकडे कार्यक्रम असल्यामुळे या भूमिपूजन सोहळ्याला येण्यास त्यांनी नकार दिल्याचे समजते. एकतर कार्यक्रम उरकून घ्या किंवा कार्यक्रमाची वेळ बदलावी, असा प्रस्ताव भुजबळांनी या अधिकार्‍यांना दिला. जिल्हा परिषदेचे ‘संकट मोचक’ म्हणून ओळख असलेल्या अधिकार्‍यांना मध्यस्थी करण्यात अपयश आल्यामुळे जिल्हा परिषदेसह ग्राम पंचायतीमधील अधिकारी अडचणीत सापडले आहेत. एकिकडे अधिकार्‍यांची कोंडी झालेली असताना ग्राम पंचायतीने तर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या नावे पत्र काढून भुजबळ व डॉ.पवार या दोघांच्याही उपस्थितीतच कार्यक्रम घ्यावा. अन्यथा घेऊ नये, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा भूमिपूजन सोहळा होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काय आहे प्रचलित पध्दत ?

मंत्री असो किंवा लोकप्रतिनिधी यांची सर्वप्रथम वेळ घेतली जाते. एकाच कार्यक्रमासाठी दोन लोकप्रतिनिधी येणार असतील तर तशी कल्पना दोघांनाही दिली जाते. दोघांनीही दिलेल्या वेळेनुसार कार्यक्रम होतो. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची रितसर वेळ घेण्यात आली. पण भुजबळांची अधिकृतपणे वेळ न घेताच त्यांना थेट कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले.

- Advertisement -

तर ही चूक झालीच नसती

छगन भुजबळ हे जिल्ह्याचे पालकमंत्री असते तर सर्वप्रथम त्यांची वेळ प्रशासनाला घ्यावी लागली असती. परंतु, त्यांच्याकडे हे पद नसल्यामुळे आमदार म्हणून त्यांना गृहित धरण्याची चूक जिल्हा परिषद प्रशासनाने केली आहे. पालकमंत्री असताना भुजबळांनीच सीईओ बनसोड यांच्यासारखे अधिकारी पाच वर्षे नाशिकला लाभावेत, असा उल्लेख केला होता. त्याच प्रशासनाला भुजबळांचा आता विसर पडलेला दिसतो, अशी खंतही येथील ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -