घरफिचर्ससारांशव्यक्तिमत्वात नऊ रंग !

व्यक्तिमत्वात नऊ रंग !

Subscribe

या नवरात्रात आपण नऊ रंगाच्या साड्या घालणार, त्यानुसार दागदागिने घालणार, केशभूषा, वेशभूषा हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय असणार. आपलं बाह्य रुप कस सुंदर, आकर्षक दिसेल यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करणार. हे नऊ दिवस आनंदात उत्साहात निघून जातील आणि विविध रंगाच्या साड्या आणि आभूषणं परत कपाटात निटनिटके ठेवले जातील. पण या नवरात्रात जर आपण आपल्या व्यक्तिमत्वात रंग भरले तर ते कायमस्वरूपी राहतील आणि आपण अंतरबाह्य सुंदर दिसू यात शंकाच नाही. म्हणूनच सर्व महिलांनी या नवरात्र उत्सवाकडे जरा वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला हरकत नाही, असं आम्ही ठरवलं आणि नवरात्र उत्सवाला जरा वेगळं रुप दिलं.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्यातील अंगभूत, उपजत असलेल्या आवडीनिवडीला आम्ही पुन्हा जागृत केलं. आपल्यामध्ये असलेले अनेक गुण, अनेक कला, अनेक छंद जे आपण काळाच्या ओघात मागे टाकले आहेत, त्यांना उजाळा दिला. पहिल्या दिवसातला एक तास आपल्यासाठी आपला छंद जोपसण्यासाठी अनेक महिलांनी आवर्जून दिला. नवरात्रीचा दुसरा दिवस आपण थोडं सामाजिक कार्य आवर्जून करूया, असं ठरवून आपल्या आजूबाजूच्या गोरगरीब, कष्टकरी, कामगार, कचरा वेचणार्‍या, घरकाम करणार्‍या महिलांना आपण आपल्याकडील जुन्या पण चांगल्या स्थिती साड्या वाटप केल्या आणि त्यांचं नवरात्रदेखील रंगीबेरंगी करायला हातभार लावला.

नवरात्रीचा तिसरा दिवस आपण सगळ्या घरातील महिला, मैत्रिणी, शेजारील महिला एकत्र येऊन कोणा एकीच्या घरी जमून छान गेट टू गेदर केला, ज्यांना शक्य झालं त्यांनी यात आपल्या पूर्ण कुटुंबातील लोकांना पण सहभागी करुन घेतले. त्यानिमित्ताने आपण सगळ्यांना एकत्र भेटणं, गप्पा मारणं, सुख दुःखाच्या गोष्टी शेअर करणं सहज शक्य झालं आणि त्यामुळे सगळ्याच रिफ्रेश झाल्या.

- Advertisement -

नवरात्रीचा चौथा दिवस प्रत्येक स्त्रीने स्वतःची बकेट लिस्ट बनवली. बकेट लिस्ट म्हणजे थोडक्यात आपल्याला आपल्या आयुष्याचा अंत होईपर्यंत ज्या ज्या चांगल्या सकारात्मक गोष्टी करायच्या आहेत त्याची यादी बनवून त्यानुसार करायला ताबडतोब सुरूवात करणे. कोणाला आवडती पुस्तकं वाचून काढायची असतील, कोणाला सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायचा असेल, कोणाला एखाद्या विशिष्ट ठिकाणी फिरायला जायची तीव्र इच्छा असेल तर कोणाला स्टेजवर नृत्य, संगीत, नाटक यात सहभागी होण्याची इच्छा असेल अशा आपल्या वैयक्तिक किमान दहा प्रबळ इच्छा लिहून काढल्या आणि त्या दिशेने प्रयत्न सुरु केले.

नवरात्रीचा पाचवा दिवस फक्त आपल्या घरातील सर्व मुलांना दिला. मुलं कोणत्याही वयोगटातील असुदे त्यांना एकत्र घेऊन बसणे, त्यांच्याशी अगदी लहानपणापासूनच्या सर्व आठवणी बोलणे, त्यांचे तुमचे, कुटुंबातील सगळ्यांचे एकत्र फोटो त्यांना दाखवणे, आपल्या कुटूंबातील सर्व मागील पिढीतील, आज हयात नसलेले आपले पूर्वज, वडीलधारी मंडळी या सगळ्यांची माहिती, आठवणी मुलांशी बोलणे यामुळे मुलांना अनेक गोष्टी माहिती झाल्या आणि कुटुंबाबद्दल आदरभाव द्विगुणित झाला.

- Advertisement -

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी महिला कोणत्याही महिला आश्रम, वृद्धाश्रमात, बालक आश्रमात जाऊन त्यांना फराळाचे पदार्थ, फळे वाटप करू शकतात असं ठरल. ज्यांना शक्य झाले त्यांनी या ठिकाणी सहकुटुंब भेट दिली. तेथील व्यक्तींच्या भावना, वेदना, संवेदना समजावून घेतल्या, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांना आधार दिला. या भेटीनंतर आपल्याला जाणीव झाली की, आपलं आयुष्य खूप सुंदर आणि समाधानी आहे, आपण खूप सुखी आहोत. त्यामुळे इथून पुढे आपण छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड, त्रागा, वाद करणार नाही, आहे ती परिस्थिती आनंदाने स्वीकारू.

सातवा दिवस!! या दिवशी आपण आपल्या वैयक्तिक शारीरिक आरोग्याच जरा मनावर घेऊया, असं महिलांनी ठरवलं. आपल्याला काही त्रास होतोय का, काही दुखतंय का, आपली तब्येत आजमितीला अपेक्षेनुसार आहे का, यावर गंभीर विचार केला. आपल्याला आपले रुटीन चेकअप करुन घ्यायचे आहे त्यासाठी ताबडतोब डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली. त्याचप्रमाणे आपल्याला आहार विहार, आपलं रुटीन, यात काही बदल करायचा असल्यास तातडीने त्याच वेळापत्रक देखील बनवलं.

आठव्या दिवशी आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वात अजून एक रंग भरायचा आहे, असं महिलांना मनापासून वाटतं होतं. निसर्गाच्या सानिध्यात माणूस आपले ताणतणाव विसरतो. निसर्गाच्या जवळ गेल्यानंतर मनावरची मरगळ जाऊन आपण ताजेतवाने होतो यात शंकाच नाही. प्रचंड गर्दी, रांग, गोंगाट आणि जत्रा असलेल्याच देवीच्या मंदिरात दर्शनाला जायला हवे ही परंपरा थोडी बाजूला ठेऊन आपण छान निसर्गरम्य ठिकाणी, दुर्लक्षित असलेले, कमी वर्दळीचे, नदी, झाड तळे, झरे याने सुशोभीत असलेले असे मंदिर शोधून, ते निवडून तिथे जाऊ शकतो असं वाटलं आणि ते पूर्ण पण केलं. शक्य झाल्यास तिथे सेवा म्हणून आपण साफसफाई करणे, अजून काही झाडे लावणे, रांगोळ्या काढणे, तिथे निवांत बसून देवींची आराधना करणे ही आगळी वेगळी अनुभूती पण महिलांनी घेतली आणि नवरात्रीला अगदी ऐतिहासिक स्वरूपात साजरं केलं.

नवरात्रीच्या नवव्या दिवशी आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनाचा लेखाजोखा एका कागदावर लिहून काढायला नक्कीच जमेल असं मनात आलं. आपल्या आयुष्यातील जमेच्या बाजू, सकारात्मक मनासारख्या घडलेल्या सर्व घटना, सर्व प्रसंग पहिले लिहून काढूया. त्यानंतर जे काही आपल्या मनाविरुद्ध घडते आहे, घडलं आहे, ज्याचा त्रास होतोय, तणाव येतोय, काळजी वाटते आहे याची एक यादी बनवूयात हेही ठरलं. आपली कोणती बाजू जास्त जमेची आहे ते लक्षात आल्यावर त्यातून अधिक चांगलं काय करता येईल यावर विचार करून आणि जे नकारात्मक मुद्दे आहेत त्यावर उपाययोजना कुठं आणि कशा करणे शक्य आहे यावर विचार करणे हे काम नवव्या दिवशी सर्वांनी मन लावून केलं.

आता दसरा!! दुःख सारे विसरा म्हणत भगिनींनी नऊ दिवसात घेतलेले विविध अनुभव, स्वतःच्या व्यक्तिमत्वात केलेले बदल लक्षात घेऊन दसर्‍याचा आनंद सहकुटुंब सहपरिवार द्विगुणित करणे अपेक्षित आहे. आपल्या कुटुंबासमवेत कुलस्वामिनीचे दर्शन, कुलधर्म, कुलाचार, नैवेद्य यामध्ये दिवस घालवत असतानाच आपण सोनं म्हणून जे प्रतिकात्मक शमी पत्र लुटणार आहोत, वाटणार आहोत त्या सोबतच आपल्या नवीन चांगल्या अंगीकारलेल्या सवयी, आपले सकारात्मक अनुभव, आपला बदललेला दृष्टिकोन, आपले फुललेले व्यक्तिमत्व आणि आपली प्रगल्भ वैचारिकतादेखील सोनंरूपाने सगळ्यांसोबत वाटत राहा. सर्व महिलांनी फक्त दसर्‍याचा एक दिवस नाही तर दररोज आपण चांगल्या विचारांचे, चांगल्या वागणुकीचे, माणुसकीचे सोने लुटूया आणि तीच खरी आदिमाया, आदिशक्तीची केलेली आराधना असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -