घरसंपादकीयअग्रलेखकाँग्रेसला नवसंजीवनी मिळणार?

काँग्रेसला नवसंजीवनी मिळणार?

Subscribe

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप सोमवारी काश्मीरमध्ये झाला. ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून निघालेली यात्रा साधारण साडेतीन हजारांहून अधिक किलोमीटरचा प्रवास करून श्रीनगरमध्ये पोहचली तेव्हा प्रतिकूल हवामानातही या यात्रेचे स्वागत झाले याची दखल घ्यावी लागेल. १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून प्रवास झालेल्या यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात, तर काही ठिकाणी अभूतपूर्व स्वागत झाले. अनेक सेलिब्रेटींपासून विविध राजकीय पक्षांतील नेते तसेच माजी सनदी अधिकारी, निवृत्त लष्करी अधिकारी ते सामान्यांपर्यंत अनेकांनी यात्रेत चालून राहुल गांधी यांना पाठिंबा दिला. हे दृश्यच मुळी अभूतपूर्व होते. ‘भारत जोडो’ अशी या यात्रेची संकल्पना असली तरी मरगळलेल्या काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करणे आणि भाजपला पद्धतशीरपणे लक्ष्य करणे हा मुख्य हेतू लपून राहिला नाही. राहुल यांना भाजपने सुरुवातीपासून टीकेचे लक्ष्य केले आहे.

पप्पू अशा शब्दात त्यांची हेटाळणी करूनही झाली, पण राहुल गांधी यांनी यावर संयम राखत पप्पू ही चिकटविण्यात आलेली प्रतिमा खोडून काढली आहे. या यात्रेच्या निमित्ताने त्यांच्या राजकीय परिपक्वतेचा आलेख काँग्रेस कार्यकर्त्यांनाच नव्हे तर काँग्रेससोबत राहू इच्छिणार्‍या विरोधी नेत्यांनाही सुखावणारा आहे. भारत जोडो यात्रेत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका करून नसता वाद ओढवून घेतला. एरव्ही ते असे काही बोलले असते तर त्यांच्या विरोधकांनी फारसे आकांडतांडव कदाचित केले नसते, पण यात्रेला मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधकांनी ठिकठिकाणी आंदोलने करून वातावरण तापवत ठेवलं. नंतर मात्र राहुल गांधी यांनी हा विषय टाळल्याने वातावरण शांत झाले. तेवढा प्रकार वगळला तर यात्रा शिस्तीने निघाल्याचे आणि देशात बदल घडवून आणण्यासाठी टाकलेले दमदार पाऊल असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

देशात अनेक पदयात्रा यापूर्वी काढण्यात आल्या आहेत. त्यात राहुल गांधी यांच्या भारत जोडो या ऐतिहासिक यात्रेची भर पडली. जोरदार हिमवृष्टी होत असताना राहुल गांधी यांनी केलेले भाषण अनेकांना भावले आहे. अर्ध्या तासाच्या भाषणात आजी इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उल्लेख केला तेव्हा ते स्वतः भावूक झाल्याचे पाहावयास मिळाले. याशिवाय त्यांनी मोदी-शहा यांच्यासह संघावरही टीका करण्याची संधी साधली. अत्यंत धीरोदात्तपणाचे दर्शन घडवत राहुल यांनी पदयात्रा काढल्याने त्यांच्या विरोधकांनाही धडकी भरली असणार यात शंका नाही. अवघ्या वर्षभरात लोकसभेची निवडणूक होईल. त्यापूर्वी नऊ विधानसभांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. काँग्रेसमुक्त भारत अशा भाजपने कितीही वल्गना केल्या तरी काँग्रेसला जवळपास २० टक्क्यांपर्यंत जनाधार आहे, हे त्यांनाही माहीत आहे. संपूर्ण देशात काँग्रेसची पाळेमुळे पोहचलेली आहेत. काँग्रेससोबत आघाडी करू पाहणार्‍या पक्षांनाही याची कल्पना आहे.

काहींचा राहुल यांच्या नेतृत्वाला विरोध असला तरी ते एकाकी सक्षमपणे लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकतील अशी परिस्थिती नाही, किंबहुना त्यांना हे माहीत आहे. त्यामुळे पदयात्रा यशस्वी करून दाखविणारे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविल्या जाण्याचीच शक्यता अधिक आहे. सध्या देशातील काँग्रेसची परिस्थिती आश्वासक वाटावी अशी खचितच नाही. राहुल यांच्या पदयात्रेचा पक्षाला किती लाभ झाला याचे उत्तर मिळण्यासाठी लोकसभा निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागेल. काँग्रेसकडे आज लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदही नाही. स्वाभाविक पुढच्या निवडणुकीत काँग्रेसकडून निर्णायक विजयाचा चौकार मारलेला दिसेल असे समजणे सर्वस्वी चूक आहे.

- Advertisement -

पदयात्रेला मिळालेली लोकप्रियता वर्षभर कायम राहिली तरी भाजपला चितपट करण्याची संधी मिळेल ही शक्यता तूर्त तरी धूसर दिसते. या एका पदयात्रेने देशात चमत्कार घडणार नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांना मरगळ झटकून जनता जनार्दनाच्या संपर्कात यावे लागेल. लोकांची कामे करून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नेते राहुल गांधी यांनी पदयात्रा काढली आणि पुढे हात जोडो यात्रा निघून पूर्ण झाली म्हणजे आपली जबाबदारी संपली असे कार्यकर्त्यांना, नेत्यांना म्हणता येणार नाही. सत्तेत कुणीही असले तरी सक्षम विरोधी पक्ष असावा लागतो. देशात आज वेगळेच चित्र आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची केविलवाणी अवस्था आहे. हे चित्र बदलण्यासाठी सक्षम नेते, कार्यकर्त्यांची फळी उभी करून गावागावातून नवनेतृत्व निर्माण करावे लागेल. पक्षात असलेल्या वाचाळवीरांच्या तोंडाला कुलूप लावावे लागेल.

राहुल यांच्या यशस्वी पदयात्रेनंतर जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, द्रमुक नेते डी. राजा यांच्यासह काही प्रमुख नेत्यांनी समाधान व्यक्त करतानाच राहुल गांधी देशाचा आश्वासक चेहरा असल्याचे म्हटले आहे, परंतु श्रीनगरमधील यात्रेच्या समारोपाला काही पक्षांनी निमंत्रण असूनही पाठ फिरवली हेही लक्षात घ्यावे लागेल. यूपीए भक्कम करण्याची गरज यातील सर्व पक्षांना वाटते, पण नेता कोण, हा मुद्दा कळीचा ठरतो. भाजपला यूपीएमध्ये दुफळी हवीच आहे. यूपीएचे काही नेते त्यांना आयते कोलीत देत आहेत. मोदी यांना समर्थ पर्याय देणारा चेहरा आजतरी विरोधकांकडे नाही. पदयात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असणार. यूपीएची मोट बांधताना हा पक्ष इतर मित्रपक्षांची मते लादून घेईल असे वाटत नाही. त्यामुळे काँग्रेस मोजक्या पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरा जाणाार का, आणि पदयात्रेमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळणार का, हे महत्त्वाचे सवाल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -