घरपालघरवसई-विरार थेट पालघरशी जोडणार नारंगी खाडी आणि वैतरणा नदीवर २ पूल

वसई-विरार थेट पालघरशी जोडणार नारंगी खाडी आणि वैतरणा नदीवर २ पूल

Subscribe

७४१ कोटींचा खर्च, वेळेची बचत

वसई-विरार आणि पालघर तालुक्यामध्ये खाडी असल्याने पालघर जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी वसई-विरारकरांना वळसा घालून जावे लागते. त्यामुळे वेळ आणि इंधनावर मोठा खर्च होतो. वसई-विरारकरांच्या वेळेची बचत करतानाच खाडीपलीकडील पालघरशी जोडण्यासाठी एमएमआरडीएने नारंगी खाडी आणि वैतरणा नदीवर असे २ स्वतंत्र पूल बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. पालघरला वसईशी जोडण्यासाठी जवळपास ३ किलोमीटर लांबीचा पूल बांधण्यात येईल, तर विरार आणि पालघरही स्वतंत्र पुलाने थेट जोडले जातील. या प्रकल्पासाठी ७४१ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएने सल्ला मागितला आहे. यासंबंधीचा विकास आराखडा अर्थात डीपीआर तयार करण्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागितल्या आहेत.

सध्या वसई किंवा विरार येथून पालघरला जायचे असल्यास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ चा (अहमदाबाद महामार्ग) वापर करावा लागतो. आता या प्रकल्पांतर्गत पालघर-विरार मार्गासाठी विरारकडील नारंगी खाडी जेट्टी ते पलीकडील पालघर तालुक्यातील दातिवरे जेट्टीदरम्यान पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाची लांबी ३.०६ किलोमीटर असेल. दोन्ही बाजूंना मिळून १ किमी अतिरिक्त मार्ग तयार करण्यात येणार आहे. या मार्गाची रुंदी १२ मीटर असेल. यामुळे वाहनचालकांचा एक तासाचा वेळ वाचणार आहे.

- Advertisement -

प्रकल्पाचा दुसरा पूल वैतरणा नदीवर बांधण्यात येणार आहे. हा पूल अर्धा किलोमीटर लांब असून रस्ता ३०० मीटर लांब आणि १२ मीटर रुंद असणार आहे. त्यामुळे वसईहून पालघरला जाणार्‍यांचा वेळ वाचणार आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरून वैतरणा नदी ओलांडल्यानंतर सातिवलीपर्यंत सरळ जाऊन त्यानंतर पुन्हा पश्चिमेकडे पारगाव-सफाळे, केळवेमार्फत राज्य महामार्गाद्वारे पालघर गाठावे लागते. यामध्ये वाहनचालकांना किमान दीड तासाचा अतिरिक्त फेरा पडतो. तो वाचवण्यासाठीच वसई ते पालघर व विरार ते पालघर असा दुहेरी मार्ग तयार करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

किमान अडीच ते तीन तास खर्ची
वसई-विरारकरांना पालघर जिल्हा मुख्यालयात दैनंदिन कामासाठी नेहमीच ये-जा करावी लागते. रेल्वेसह रस्तामार्गे पालघरला ये-जा करता येते. रस्तामार्गे मुंबई-अहमदाबाद हायवेवरून जावे लागते. त्यामुळे किमान अडीच-तीन तास लागतात. त्यामुळे वेळ आणि इंधनही मोठ्या प्रमाणावर वाया जाते. रेल्वेच्या सेवा मर्यादित आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने स्वतःच्या वाहनाने ये-जा करणे वेळकाढू आणि खर्चिक आहे. या सर्वांचा विचार करूनच एमएमआरडीएने पालघर थेट जोडण्याची योजना हाती घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -