घरमहाराष्ट्रथोरातांसोबत माझा वाद नाही, भाजपने अफवा पसरवल्याचा पटोलेंचा आरोप

थोरातांसोबत माझा वाद नाही, भाजपने अफवा पसरवल्याचा पटोलेंचा आरोप

Subscribe

विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि आपल्यामध्ये कोणतेही वाद नाहीत. आम्ही एकत्रच आहोत. विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर आणि नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे. या पराभवाकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी भाजपने आमच्यात मतभेद असल्याचे वातावरण निर्माण केले तसेच माध्यमांनी त्याला हवा दिली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

बुधवारी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीत बोलताना पटोले यांनी कसबा पेठ आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील. भाजपच्या कारभाराला जनता कंटाळली असून त्यांचा पराभव करण्यासाठी आणि आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करण्याचा संकल्प करा, असे आवाहन केले.

- Advertisement -

यावेळी बोलताना पटोले यांनी विधान परिषदेच्या अमरावती निवडणुकीबाबत खळबळजनक दावा केला. ५० कोटी रुपये देऊन अमरावतीचा निकाल फिरवण्यात येणार होता, पण मी आयुक्तांना इशारा दिला आणि ते टाळले, असा सनसनाटी गौप्यस्फोट त्यांनी केला. ही रक्कम नंतर १०० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता होती, असेही ते म्हणाले. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीच्या धीरज लिंगाडे यांनी सर्वाधिक मते घेतली, पण त्यांना विजयी घोषित करण्यात येत नव्हते. निवडणुकीची मतमोजणी ३० तासांपर्यंत सुरू होती. त्यावेळी मला आयबीमधून एका मित्राचा फोन आला. त्याने सांगितले की, अमरावतीचा निकाल बदलण्याची तयारी सुरू आहे. हे ऐकल्यानंतर मी अस्वस्थ झालो होतो आणि मला रात्रभर झोप आली नाही, असेही पटोले म्हणाले.

तर भारत जोडो यात्रेची दखल जगाने घेतली आहे. एवढी मोठी पदयात्रा जगाच्या पाठीवार आजपर्यंत झालेली नाही. ही यात्रा महाराष्ट्रात यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम केले आणि त्याचे कौतुक देशभर झाले. भारत जोडो यात्रेने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचे काम केले. भाजपचा कारभार पाहता देशात लोकशाही, संविधान राहील का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, पण भारत जोडो यात्रेने जनतेच्या आशा काँग्रेसकडून वाढल्या आहेत. देश, लोकशाही आणि संविधान वाचवण्याचे काम काँग्रेसच करू शकतो, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतील वातावरण पाहता राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला भीती वाटू लागली आहे. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळल्या जात आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केला. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही एकत्रितच घेतल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी वर्ष हे महत्त्वाचे आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेचा विजय झाला असून ही विजयाची पहिली पायरी आहे. आता आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कामाला आतापासूनच लागा, असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, खासदार कुमार केतकर, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजित कदम, सतेज बंटी पाटील, वसंत पुरके, आमदार प्रणिती शिंदे आदी उपस्थित होते.

माझ्या नाराजीच्या चर्चा मला मीडियामार्फत कळत आहेत. मी नाराज नव्हतोच. प्रत्येक संघटनेत पत्रव्यवहार सुरू असतो, तसा आम्हीही केला.
-बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते, काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -