घरमुंबईकदमांच्या अटकेआधी मुलुंडचा 'पोपटलाल' बोंबलतो, संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल

कदमांच्या अटकेआधी मुलुंडचा ‘पोपटलाल’ बोंबलतो, संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल

Subscribe

दापोलीतल्या साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने सदानंद कदम यांना अटक केली आहे. या कारवाईवरून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माजी खासदार किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केलाय.

दापोलीतल्या साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने सदानंद कदम यांना अटक केली आहे. ईडीने सदानंद कदम यांना त्यांच्या खेडमधल्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना खेडमधून मुंबईतल्या ईडी कार्यालयात आणण्यात आलं. इथे त्यांची तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना अटक करण्यात आली आहे. सदानंद कदम हे शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. या कारवाईवरून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माजी खासदार किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केलाय. “सदानंद कदमांच्या अटकेआधी मुलुंडचा पोपटलाल बोंबलतो, याचा अर्थ काय?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. साई रिसॉर्टचं खरेदी विक्री प्रकरण अत्यंत संशयास्पद असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सदानंद कदम यांच्या नावाचा वापर करून डमी मालक उभा केला होता. त्यानंतर कदम यांच्या नावावर सर्व व्यवहार करून मालक म्हणून स्वत:ची ओळख लपवली होती, असा आरोप सोमय्यांचा आहे. याच प्रकरणी सध्या ईडीकडून तपास सुरु आहे.

- Advertisement -

याप्रकरणी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी भाजप आणि किरीट सोमय्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलंय. “खेड येथील उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी करण्यासाठी सदानंद कदमांचा मोठा हातभार होता. त्यामुळेच कदम यांची अटक म्हणजे राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे. ईडीची ही कारवाई बोगस आहे. महाविकास आघाडीच्या विजयी घोडदौडीला खिळ घालण्यासाठी ही कारवाई आहे. तसंच सदानंद कदमांच्या अटकेआधी मुलुंडचा पोपटलाल बोंबलतो. ईडीच्या कारवाईवर मुलुंडचा पोपटलाल बोलतो, याचा अर्थ काय आहे? अटकेची बातमी आधी मुलुंडमधून येते, याचा अर्थ काय” असं देखील संजय राऊत म्हणाले.

“तसंच विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडीची कारवाई आहे. किडनी बदलून सिंगापूरहून परतलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावरही ईडीने छापा टाकलाय. त्यांच्या घरातील गर्भवती सूनेची सुद्धा सोळा तास ताब्यात घेऊन चौकशी केली. आम्ही अनेक वर्षापासून किरीट सोमय्यांच्या INS विक्रांत घोटाळ्याची चौकशीची मागणी करतोय, त्या प्रकरणात क्लिन चीट देण्यात येते. देशाच्या बॅंका बुडवणारे लोक भाजपमध्ये येऊन काम करतात आणि आमच्यावर हल्ले करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीनं पुन्हा एकदा धाड टाकली आहे. कोल्हापुरातील साखर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांच्यावर केलाय. मी काही कारखान्यांची यादी फडणवीसांना पाठवणार, त्या प्रकरणात सुद्धा ईडी चौकशी होणार का? कसब्याच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या यशस्वी घोडदौडीला खिळ घालण्यासाठी या कारवाई केल्या जात आहेत.” असा आरोपही यावेळी संजय राऊतांनी केलाय.

- Advertisement -

यापुढे बोलताना संजय राऊतांनी शिंदे गटावरही हल्लाबोल केलाय. “शिंदे गट हा पक्ष नव्हे तर एक टोळी असल्याचं वक्तव्य यावेळी संजय राऊतांनी केलं. तसंच आमच्यावर कितीही कारवाया झाल्या तरी आम्ही गुडघे टेकणार नाही, असा इशाराही संजय राऊतांनी दिलाय. इचलकरंजीमध्ये धैर्यशील माने जनतेचा मार खाता खाता राहिला, लोकांच्या मनात भाजपबद्दल राग आणि चीड आहे, ती उफाळून येताना दिसतेय. 2024 नंतर याच लफंग्यांना लोक रस्त्यावर उतरून मारतील.”, असं देखील संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -