घरमहाराष्ट्रनाशिकशिक्षण समिती निवडणूक : भाजपने अंथरलेले रेड कार्पेट सेनेने लाथाळले

शिक्षण समिती निवडणूक : भाजपने अंथरलेले रेड कार्पेट सेनेने लाथाळले

Subscribe

शनिवारी होणार फैसला, सभापतीपदासाठी भाजपच्या सोनवणेंना सेनेच्या डेमसेंचे आव्हान

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण मंडळाचे उपसभापतीपद देण्यासाठी भाजपने शिवसेनेसमोर रेड कार्पेट अंथरले खरे; मात्र सेनेने ही ऑफर नाकारत एक मत फोडून ऐनवेळी भाजपला धोबीपछाड देण्याचा डाव रचला आहे. दरम्यान, शिक्षण मंडळ सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक येत्या शनिवारी (दि. २९) रोजी होत असून सभापतीपदासाठी भाजपच्या सरिता सोनवणे व शिवसेनेचे सुदाम डेमसे यांनी तर उपसभापतीपदासाठी भाजपच्या प्रतिभा पवार व शिवसेनेचे संतोष गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत.

पावणेदोन वर्षानंतर भाजपच्या सत्ताकाळात शिक्षण समिती की, शिक्षण मंडळ याचा वाद संपुष्टात आला आहे. मंडळाचा वाद संपुष्टात आल्यानंतर भाजपने समिती किती सदस्य असावेत यावरून भाजपने वेळ वाया घालवला. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महासभेत शिक्षण व वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु मंडळाप्रमाणेच सोळा सदस्यांची नियुक्ती करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. प्रशासनाने नऊ सदस्यांचा प्रस्ताव सादर केला होता. नियमाप्रमाणे नऊ सदस्यांचीचं नियुक्ती करता येणार असल्याने भाजपने तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर यु-टर्न घेत नऊ सदस्यांची नियुक्ती जाहीर केली.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत नऊ सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. भाजपच्या वर्षा भालेराव, प्रतिभा पवार, सरीता सोनवणे, स्वाती भामरे, दिनकर आढाव, यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तर शिवसेनेचे चंद्रकांत खाडे, संतोष गायकवाड, सुदाम डेमसे व काँग्रेसच्या राहुल दिवे यांना समिती सदस्य म्हणून घोषणा करण्यात आली. या समितीच्या सभापतीपदाची निवडणूक शनिवारी होणार असून सभापतीपदासाठी भाजपकडून सरिता सोनवणे यांचे तर शिवसेनेकडून नगरसेवक सुदाम डेमसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपसभापतीपदासाठी भाजपच्या प्रतिभा पवार व शिवसेनेचे संतोष गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सेनेचा राग काढण्यासाठी उपसभापतीपद हे सेनेला देण्यासाठी भाजप प्रयत्नशिल आहे. अशा परिस्थितीत सभापतीपदी सोनवणे तर उपसभापतीपदी गायकवाड यांची नियुक्ती होईल. सेनेने भाजपच्या कुबड्या घेण्यास नकार दिल्यास उपसभापतीपदी प्रतिभा पवार यांची वर्णी लागेल. दरम्यान, नामनिर्देशपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी, शिक्षण समिती सभापतीपदासाठी शिवसेनेचे सुदाम डेमसे आणि भाजपच्या सरिता सोनवणे यांनी पक्षादेशानुसार अर्ज भरला.

भाजपचा वरचष्मा

शिक्षण समितीतील ९ पैकी ५ सदस्य हे भाजपचे असल्याने सभापतीपदावर भाजपचा सदस्य विराजमान होणार आहेत. भाजपचे बहुमत असल्याने ऐनवेळी मत न फुटल्यास सभापती आणि उपसभापती पदावर भाजप सदस्यांची वर्णी लागणार आहे. सेनेकडे तीन सदस्य असून विरोधी पक्षातील काँग्रेसकडे एक सदस्य आहे. भाजपचा एक सदस्य निवडणुकीच्या वेळी गैरहजर राहिल्यास चिठ्ठी पध्दतीने निवडणूक होऊ शकते.

- Advertisement -

दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ

सभापतीपदासाठी भाजपच्या वेगवेगळ्या गटांमध्ये प्रचंड रस्सीखेच होती. आ. देवयानी फरांदे यांच्याकडून स्वाती भामरे यांचे तर दिनकर पाटील यांच्याकडून वर्षा भालेराव यांचे नाव पुढे करण्यात आले. दोघांच्या भांडणात तिसर्‍याचा लाभ’ या उक्तीप्रमाणे या दोघांनाही उमेदवारी नाकारण्यात येऊन सरिता सोनवणे यांच्या नावावर अखेरच्या दिवशी शिक्कामोर्तब झाला.

ऐनवेळी चमत्कार घडवू

महापालिकेत शिवसेना आणि भाजपची सत्ता नसल्याने शिक्षण मंडळासाठी त्यांचा आधार घेण्याचा प्रश्नच उरत नाही. पक्षादेशानुसार सभापती आणि उपसभापतीपदासाठी आम्ही उमेदवार दिले आहेत. या पदांसाठी एकच मत कमी असून ऐनवेळी आम्ही चमत्कार घडवून आणू.  – विलास शिंदे, गटनेते, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -