घरमुंबईमुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर; महापालिकेचा पुढाकार

मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर; महापालिकेचा पुढाकार

Subscribe

मुंबईः  मुंबईच्या रस्त्यावर दरवर्षीच्या पावसामुळे निर्माण होणारे खड्डे बुजवण्यासाठी, खराब रस्ते दुरुस्तीसाठी रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट (एम ६०) आणि रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची दिलासा मिळणार आहे.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली या नव्या तंत्रज्ञानाने खड्डे बुजवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्तांकडे रस्ते विभागाच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीनुसार दोन्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खड्डे बुजवण्यासाठी अधिकाधिक कंपन्यांनी प्रतिसाद द्यावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.

- Advertisement -

नव्या तंत्रज्ञानाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा वापर करण्यात येणार आहेत. या पद्धतीमध्ये खड्डे विशिष्ट आकारात कापणे व योग्य तंत्रज्ञानाने भरणे यासारख्या कामांचा समावेश आहे. या कामांचा दोषदायित्व कालावधी (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) तीन वर्षांसाठीचा असणार आहे. त्यामुळे या कालावधीत रस्त्यांवर खड्डे होणार नाहीत, याची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची असणार आहे.

या कामासाठी ज्या पुरठादारांकडे रेडीमिक्स कॉंक्रिट प्रकल्प आहे, तसेच रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट आणि रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट तंत्रज्ञान पुरवण्याची तयारी आहे, अशा पुरवठादारांना महापालिकेने या कामासाठी आवाहन केले आहे. तसेच या तंत्रज्ञानाने साहित्य पुरवठा करणाऱया कंपन्यांनाही या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. इच्छुक पुरवठादारांनी मुंबई महापालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी खड्डे बुजवण्याच्या कामाचे मोफत प्रात्यक्षिक देणे अपेक्षित आहे. रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिट आणि रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट या दोन्ही तंत्रज्ञानाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठीचे तसेच खराब भाग दुरूस्तीचे प्रात्यक्षिकही याठिकाणी देणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही पुरवठादारांनी या प्रक्रियेत सहभाग नोंदवला. आतापर्यंत रिअॅक्टिव्ह अस्फाल्टसाठी दोन पुरवठादारांनी तर रॅपिड हार्डनिंग कॉंक्रिटला तीन पुरवठादारांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र या प्रक्रियेत अधिक पुरवठादारांनी सहभाग घ्यावा व स्पर्धात्मक प्रतिसाद मिळावा, या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) वेलरासू यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रशासन प्रयत्न करीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -