घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे बीगुल वाजले; यंदा तिरंगी लढतीची चर्चा

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे बीगुल वाजले; यंदा तिरंगी लढतीची चर्चा

Subscribe

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत आजवर दुरंगी लढत बघायला मिळायची. परंतु, यंदा या निवडणुकीत तिरंगी लढतीचा सामना होण्याची शक्यता आहे. गेल्या चार महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे बिगूल अखेर वाजले. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सध्या महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या असल्या तरी बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळीदेखील चर्चेत असेल. दरवेळी माजी खासदार देविदास पिंगळे आणि माजी नगरसेवक शिवाजी चुंभळे हे पॅनल बनवून एकमेकांविरोधात लढत आले आहे. यंदा मात्र ही निवडणूक अजून चुरशीची होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांपासून देविदास पिंगळे आणि माजी नगरसेवक दिनकर पाटील, शिवाजी चुंभळे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यासाठी हे गट पत्रकार परिषदा घेत असल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी दिसले. अशातच आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने प्रचारादरम्यान कोण कुणावर कोणते आरोप करणार आणि त्याला कसे प्रत्युत्तर मिळणार, हे काही दिवसांत बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापनेनंतर भाजपच्या काही पदाधिकार्‍यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय राजवट लागू असताना प्रशासनाचा कार्यकाळ संपत आला असता अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून नियुक्ती करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्या नियुक्त्या लांबणीवर पडल्या. परंतु, या अशासकीय सदस्य निवडीसाठी फक्त भाजपच्याच पदाधिकार्‍यांची यादी असल्याचे समजताच शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांकडून नाराजी व्यक्त केली गेली होती. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने कदाचित माजी सभापती शिवाजी चुंभळे, दिनकर पाटील यांचे एक पॅनल, माजी खासदार तथा माजी सभापती देविदास पिंगळे यांचे दुसरे पॅनल आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या पदाधिकार्‍यांचे तिसरे पॅनल बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्यातरी निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी संचालक, बाजार समिती व्यापारी तसेच हमाल हे मतदार आहेत. त्यामुळे यंदा कुणाची सत्ता येईल हे एप्रिल महिन्याच्या शेवटी समजेल.

निवडणूक कार्यक्रम असा :
  • निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे : दि. २७ मार्च
  • अर्ज दाखल करणे : २७ मार्च ते ३ एप्रिल
  • अर्ज छाननी : ५ एप्रिल
  • वैध अर्ज प्रसिद्धी : ६ एप्रिल
  • अर्ज माघारी : २० एप्रिल
  • चिन्हे वाटप : २१ एप्रिल
  • मतदान पहिला टप्पा : २८ एप्रिल
  • पहिला टप्पा मतमोजणी : २९ एप्रिल
  • मतदान दुसरा टप्पा : ३० एप्रिल
  • मतमोजणी दुसरा टप्पा : ३० एप्रिल २०२३
विभागनिहाय मतदार नाशिक कृउबा
  • ग्रामपंचायत सदस्य – नाशिक – ६७४, त्र्यंबकेश्वर – ७४२, पेठ – ६५० एकूण २०६६ मतदार
  • सोसायटी मतदार- नाशिक – ९१६, त्र्यंबकेश्वर – ३५१, पेठ – १२५ एकूण १३९२
  • व्यापारी मतदार – १०४८,
  • हमाल मतदार – १५८.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -