घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहापालिकेच्या प्रांगणात दरवळतोय पुष्पोत्सवाचा गंध

महापालिकेच्या प्रांगणात दरवळतोय पुष्पोत्सवाचा गंध

Subscribe

नाशिक : महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग आणि नाशिक रोझ सोसायटी व नाशिक सिटीझन फोरम यांच्या सहकार्याने आयोजित पुष्पोत्सव २०२३चे शुक्रवारी (दि.२४) उत्साहात उद्घाटन झाले. उद्यान विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी प्रास्ताविकात पुष्पोत्सवाची माहिती दिली. अभिनेत्री अर्चना निपणकर, जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपायुक्त मनोज घोडे-पाटील, करुणा डहाळे, अधीक्षक अभियंता रवींद्र चव्हाणके, उदय धर्माधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन, डॉ. कल्पना कुटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, विभागीय अधिकारी मयूर पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी विजया अशोक दुधारे यांच्या ’सुमनांतरी’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी उद्यान विभागाचे कौतुक करत अधिकाधिक नागरिकांनी फुलांची दुनिया पाहावी, असे आवाहन केले. आयुक्तांनी आपल्या भाषणात ’रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुलारे गवतफुला’ या शाळेतील कवितेचा उल्लेख करत नाशिकला गुलशनाबादची जुनी ओळख मिळून देण्यासाठी आवाहन केले. जागरुक नागरिकांनी वृक्षतोडीची माहिती तातडीने द्यावी. संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली. अर्चना निपणकर यांनी पुष्प महोत्सवातील विविध संकल्पनांचे कौतुक केले.

- Advertisement -

मान्यवरांच्या हस्ते परीक्षक आणि रोझ सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष धनंजय गुजराथी, पुणे रोझ सोसायटीचे माजी अध्यक्ष रवींद्र भिडे यांचा सन्मान करण्यात आला. उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी आभार मानले. नृत्य रंगवेध’ने कार्यक्रमाचा समारोप झाला. दोन वर्षांच्या अंतरानंतर ‘पुष्पोत्सवा’चे आयोजन झाल्याने महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा पेटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सायक्लोन डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी गीत सादर केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -