घरअर्थजगत20 हजार कोटी रुपये आले कुठून? राहुल गांधींच्या प्रश्नाला अदानी समूहाने दिले...

20 हजार कोटी रुपये आले कुठून? राहुल गांधींच्या प्रश्नाला अदानी समूहाने दिले उत्तर

Subscribe

नवी दिल्ली : अदानी समूहात 20 हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्याला आता प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी उत्तर दिले आहे. 2019पासून, समूहातील कंपन्यांनी त्यांचे हिस्से विकून 2.87 अब्ज डॉलर्स (सुमारे 20,000 कोटी) उभे केले आहेत, ज्यापैकी 2.55 अब्ज डॉलर्स व्यवसायात पुन्हा गुंतवले आहेत, असा खुलासा अदानी समूहाने केला आहे.

हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाचे गौतम अदानी विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेतही हा मुद्दा उचलून धरला होता. अदानींविषयी प्रश्न विचारले. परंतु आपल्याला बोलू दिले गेले नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला. अलीकडेच त्यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले. अदानी समूहात 20 हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? असा सवाल त्यांनी केला होता.

- Advertisement -

गौतम अदानी यांच्या समूहाने सोमवारी, 2019पासून त्यांच्या कंपन्यांमधील 2.87 अब्ज डॉलर्स किमतीच्या भागविक्रीचे तपशील सूचीबद्ध केले असून समूहाने 2.55 अब्ज डॉलर्स कसे उभे केले आणि व्यवसायात गुंतवणूक कशी केली, अशी माहिती दिली आहे. याद्वारे त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. अबू धाबीस्थित ग्लोबल स्ट्रॅटेजिक इनवेस्टमेंट कंपनी, इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी पीजेएससी (IHC) सारख्या गुंतवणूकदारांनी अदानी एंटरप्राइझ लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) यासारख्या कंपन्यांमध्ये 2.593 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली. तसेच प्रवर्तकांनी अदानी टोटल गॅस लिमिटेडमधील हिस्सा विकला, असेही अदानी समूहाने म्हटले आहे.

हे फंड प्रवर्तक संस्थांनी व्यवसाय विस्तारासाठी तसेच अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेड सारख्या कंपन्यांमध्ये पुन्हा गुंतवले असल्याचे अदानी उद्योग समूहाने नमूद केले आहे.

- Advertisement -

आम्ही एक्सचेंजच्या नियमांचे पूर्णपणे पालन करत आहोत तसेच प्रवर्तक, स्वामित्व आणि निधी उभारणी यासारख्या गोष्टींमध्ये कोणताही गैरप्रकार करत नाही. जानेवारी 2021मध्ये, प्रवर्तकांनी अक्षय्य ऊर्जा फर्म एजीईएलमधील 20 टक्के भागभांडवल फ्रान्सची आघाडीची कंपनी टोटल एनर्जीला विकून 2 अब्ज डॉलर्स उभे केले. अदानी टोटल गॅस लिमिटेडमधील 37.4 टक्के हिस्सा फ्रेंच फर्मला 783 दशलक्ष डॉलर्समध्ये विकले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -