घरफिचर्सलक्ष्मीकांत बेर्डे जसा होता तसाच लोकांना आवडला - पुरुषोत्तम बेर्डे

लक्ष्मीकांत बेर्डे जसा होता तसाच लोकांना आवडला – पुरुषोत्तम बेर्डे

Subscribe

‘माय महानगर’च्या ‘महानगर आणि मी’ या स्पेशल शोमध्ये कला, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात येतं. यावेळी ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तेव्हा बोलताना त्यांनी त्यांच्या कामाठीपुऱ्यातल्या जडण घडणीपासून ते लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्वभाव वैशिष्ट्यांपर्यंतचे अनेक मुद्दे उलगडून दाखवले!

‘लक्ष्मीकांतला कुणी गॉडफादर नव्हता. त्याला कुणी घडवलं नाही. लक्ष्मीकांत बेर्डे जसा होता, तसाच लोकांना आवडला. त्याने वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांनी सांगितलं आम्हाला तू तसाच पाहिजेस, अशी स्वानुभवाची प्रतिक्रिया ज्येष्ठ सिनेलेखक-दिग्दर्शक आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे ज्येष्ठ बंधू पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिली आहे. mymahanagar.com च्या फेसबुक लाइव्हवर ‘महानगर आणि मी’ या स्पेशल शोमध्ये पुरुषोत्तम बेर्डे यांनी त्यांचा लहान भाऊ लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

‘माय महानगर’च्या ‘महानगर आणि मी’ या स्पेशल शोमध्ये कला, मनोरंजन क्षेत्रातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात येतं. यावेळी ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तेव्हा बोलताना त्यांनी त्यांच्या कामाठीपुऱ्यातल्या जडण घडणीपासून ते लक्ष्मीकांत बेर्डेंच्या स्वभाव वैशिष्ट्यांपर्यंतचे अनेक मुद्दे उलगडून दाखवले!

- Advertisement -

लोकांना तो तसाच हवा होता

लक्ष्मीकांत बेर्डे आहे तसाच लोकांसमोर गेला. त्याच्या चाहत्यांना देखील तो आहे तसाच हवा होता. त्यामुळेच ‘लक्षातला लक्ष्या’ या बायोथिएट्रिकल ड्रामामध्ये आम्ही कुठेही त्याची ती प्रतिमा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला नाही. ती आहे तशीच ठेवली, असं पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले. अशा घराघरात पोहोचलेल्या व्यक्तीवर तुम्ही काही बनवत असता, तेव्हा ती जबाबदारी असते. कारण तो लोकांचा असतो, असंही त्यांनी नमूद केलं.

लक्ष्मीकांत बेर्डेंवरचा बायोथिएट्रिक कसा असेल?

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर येऊ घातलेल्या लक्षातला लक्ष्या या बायोथिएट्रिकवर देखील पुरुषोत्तम बेर्डे यांनी यावेळी प्रकाश टाकला. ‘लक्ष्मीकांत बेर्डेंची भूमिका यात कुणी एक व्यक्ती करत नाहीये. ही गोष्ट मी सांगतोय. तसे प्रेक्षक त्यांच्या पद्धतीने त्या त्या व्यक्तीरेखा उभ्या करणार. थिएटरमध्ये मेक बिलीव्ह थिएरीनुसार आपल्याकडे प्रेक्षक तयार झाला आहे. पडद्यावर आपण नाटकं बघितले आहेत. त्यामुळे मेक बिलीव्ह थिएरीचा वापर केला आहे. त्यामुळे सुरुवातीलाच पडद्यावर ७-८ लक्ष्मीकांत बेर्डे येतात. शिवाय दुसरा लक्ष्मीकांत बेर्डे होऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे. त्याचं टायमिंग, सेन्स ऑफ ह्युमर नाही होऊ शकत. सिनेमात तुम्हाला चीटिंग करता येते. पण नाटकात नाही, असं ते म्हणाले.

- Advertisement -

भस्म सिनेमा कसा आकाराला आला?

यावेळी पुरुषोत्तम बेर्डे त्यांच्या प्रचंड गाजलेल्या आणि वेगळ्या विषयावरच्या भस्म सिनेमाविषयी देखील बोलले. ‘त्या काळात माहेरची साडी प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्यामुळे ज्यांना फक्त पैसे कमवायचे होते, त्यांनी माहेरची साडीसारख्या सासू-सुना विषयांमध्ये पैसे टाकले होते. त्यामुळे सगळे स्टॅगनंट झाले होते. जसं आता सैराट झाल्यानंतर झालंय. सगळ्यांना दुसरा सैराटच करायचा आहे. पण मला माहेरची साडीसारखं काही करायचं नव्हतं. सासू-सुनेचा छळ दाखवायचा नव्हता. नंतर माझ्या वाचनात जेव्हा भस्म आली, तेव्हा मला त्याच्यात सिनेमा दिसला. तेव्हा माझा सेम टू सेम ६ आठवडे हाऊस फुल्ल चालला. तेव्हा टॅक्सच्या पैशांतून दुसरा चांगला सिनेमा काढा अशी सरकारची स्किम होती. सेम टू सेमच्या १२ लाखांच्या टॅक्सच्या पैशांचा मी पुरेपूर वापर केला. तेव्हा २०-२५ लाखांमध्ये मराठी सिनेमा व्हायचा. मी १२ लाखांचा भस्म प्लॅन केला’, असं ते म्हणले.

अशोक सराफ यांची ‘ती’ भूमिका!

अशोक सराफ यांची भस्म सिनेमामधली भूमिका प्रचंड गाजली होती. त्या भूमिकेचं गुपित यावेळी पुरुषोत्तम बेर्डेंनी उलगडून दाखवलं. ‘घायाळ सिनेमात अशोक सराफ महत्त्वाची भूमिका करत होते. त्यांच्या गंभीर भूमिका फार कमी पण भिडलेल्या होत्या. तेव्हा घायाळचा कोल्हापूरला प्रिमियर होता. संध्याकाळी ते मुंबईला निघणार होते. मी हॉटेलवर त्यांना निरोप द्यायला गेल्यावर त्यांनी माझ्या हातात उत्तम बंडू तुपेंचं भस्म पुस्तक बघितलं. मी त्यावर पुढच्या सिनेमाविषयी सांगितलं. त्यांनी प्रमुख भूमिका कोण करतंय ते विचारलं. त्या काळी अशोक सराफ सुपरस्टार आणि मोठ्या बजेटचे होते. मी त्यांना छोट्या बजेटचा सिनेमा असल्याबद्दल सांगितलं. तर ते म्हणाले मी तुला पैसे विचारलेच नाहीत. पुस्तक वाचल्यानंतर २-३ दिवसांनी त्यांनी फोन करून सांगितलं मी करतो. शिवाय फक्त ड्रायव्हर आणि मेकअपमनचे पैसे जेवढे जमतील तेवढे दे आणि बाकी काही सांगू नकोस असंही सांगितलं’.

‘टुरटुरचा’ जन्म कसा झाला?

टुरटुर या पुरुषोत्तम बेर्डेंच्या प्रचंड गाजलेल्या नाटकाचा जन्मच त्यांच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये झाल्याचं यावेळी ते म्हणाले. ‘कॉलेजमध्ये असताना आमची कर्नाटकला एक स्टडी टूर गेली होती. तिथून परत आल्यानंतर मी त्यावर आधारित बरंच भिंतीवरचं लेखन, पोस्टर्स असं काम केलं. त्याशिवाय टुरटूर नावाची एक एकांकिका देखील लिहिली. तिला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिथूनच माझ्यातला लेखक-दिग्दर्शक जोपासला गेला. पुढे मी ती एकांकिका नाटक स्वरुपात व्यावसायिक रंगभूमीवर लक्ष्मीकांत बेर्डेला घेऊन आणली’.

मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे का?

या प्रश्नावर त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. आणि त्याला ‘श्वास’ या सिनेमाचं कारण दिलं. ‘श्वासनंतर मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. काही काळापूर्वी प्रायोगिक रंगभूमीवर नवीन विषय यायचे होते. तसं श्वासनंतर झालंय. श्वासच्या आधी जे विषय निर्माते घ्यायला घाबरायचे, असे विषय समोर आले. लोकांना कधीकधी झोळीवालं कुणीतरी दिसलं, की वाटायचं, हे आम्हाला खड्ड्यात घालणार आहेत. पण अशा लोकांना श्वासनंतर स्कोप मिळाला. क्रांतीच झाली असं म्हणायला हवं. श्वासच्या आधीही जब्बार पटेल, अमोल पाटेकर, राजदत्त यांनीही वेगळे सिनेमे केले. पण श्वासमुळे अशा विषयांना ग्लॅमर मिळालं’.

मराठी सिनेमे लो बजेटमुळे मागे राहातात का?

मराठी सिनेमांच्या लो बजेटचा मुद्दा यावेळी मुलाखतीमध्ये चर्चेला आला. त्यावर पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिलखुलास उत्तरं दिली. ते म्हणाले, ‘रिकव्हरीची गॅरंटी नसल्यामुळे ही समस्या होते. मला अनुभव आहे की आमच्या मुहूर्ताच्या दिवशी जे लोकं यायचे, ते डिव्हीडी मागायचे. मराठी प्रेक्षक सिनेमा पाहायला जातच नाहीत. त्यामुळे निर्माता मग सिनेमा लो बजेट ठेवतो. रिकव्हरीच्या दृष्टीने बजेट ठेवलं जातं. आता तर नेटफ्लीक्स, अॅमेझॉन, चॅनेल, अनुदान असे रिकव्हरीचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. शिवाय आता सिनेमा बनवणं सोपं झालंय. मोबाईलवर सुद्धा तुम्ही सिनेमा शूट करू शकतात. पण तरीही रिकव्हरी हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे.’

भाईला सिंगल स्क्रीन मिळत नाही. त्यावर काय सांगाल?

‘भाई’ सिनेमाला सिंगल स्क्रीन थिएटर मिळत नाहीत, यावर त्यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. ‘सिम्बा असो वा खम्बा असो, मराठी सिनेमाला थिएटर्स मिळायलाच हवीत. मग काय मराठी सिनेमे केरळमध्ये का तामिळनाडूमध्ये रिलीज करणार का? भाई काही फार शो मागत नाही. फक्त प्रॉमिनंट शो द्यायला हवेत. मुळशी पॅटर्नला मिळाले, नाळला देखील मिळाले. कारण थिएटर्सवाल्यांना मराठी सिनेमाला प्रॉमिनंट शो देण्याच्या अटीवर कन्सेशन मिळालं आहे. त्यामुळे ते काही दयामाया दाखवणार नाहीत. उपकार करणार नाहीत. हक्क आहे मराठी सिनेमांचा.’

भाईला थिएटर नाकारतात, ठाकरेला मिळतात

एकीकडे ‘भाई’ सिनेमाला सिंगल स्क्रीन थिएटर्स मिळत नसताना ‘ठाकरे’ला मात्र थिएटर्स मिळतात. असं का? या प्रश्नावर त्यांनी ठाकरेंच्या प्रतिमेविषयी उत्तर दिलं. ‘दहशत, दुसरं काय? ठाकरेंना थिएटर नाकारून दाखवावं कुणी. बाळासाहेबांच्या इमेजचा हा भाग आहे. ही दहशत निर्मात्यांनी निर्माण केलेली नाही. वाघ येतोय म्हटल्यावर त्याला सांगावं लागत नाही की मला घाबरा. तसंच ठाकरे येतोय म्हटल्यावर लोकं त्यासाठी थिएटर देणारच. भाई हा कल्चरल ठेवा आहे. त्याला कोण घाबरतं?’

तुम्हाला चित्रपटाची आवड कुठून निर्माण झाली?

बालपण कामाठीपुऱ्यात गेलं. त्याच्या आसपास बरेच थिएटर्स आहेत. त्यामुळे चित्रपटाचं वातावरण आसपास होतंच. नाटक आणि सिनेमा हे प्रत्यक्ष पाहाण्याशिवाय दुसरं काही माध्यमच नव्हतं. जेजेमध्ये चित्रकला हे दृष्य माध्यम शिकलो. आणि सिनेमा हे त्याचंच एक्सटेन्शन अर्थात दृक् श्राव्य माध्यम आहे. त्यात मी जिथे राहायचो, तिथे डिस्ट्रिब्युशनची किशोर फिल्म कॉर्पोरेशन ही एजन्सी होती. त्यामुळे लहानपणापासून चित्रपट पाहायचो. त्यानंतर जेजेमध्ये दामू केंकरे डीन होते. तिथून पुढे नाटक-सिनेमांची ही आवड जोपासली गेली. त्याशिवाय खेतवाडीत महाजनवाडीमध्ये आमचे लहानपणापासून सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. तिथून माझी जडण-घडण होत गेली.

अलवारा डाकूचा विषय आता राहिलेला नाही

तेव्हा दलित चळवळ खूप स्ट्राँग होती. पण गेल्या ४० वर्षांमध्ये सरकारी धोरणं, लोकांमधली जनजागृती यामुळे आता अलवारा डाकू पुन्हा केलं तर त्याची फक्त रचना दिसेल. पण ते आयडेन्टिफाय होईल की नाही, यावर संशय आहे. नामदेव ढसाळांच्या चळवळीच्या वेळी मी कामाठीपुऱ्यात राहायचो. तेव्हा मी जे पाहिलं, ते त्या नाटकात आहे.

प्रचारासाठी जाऊ बाई जोरातमध्ये सगळ्याच महिला

जाऊबाईचा कंटेंटच तो होता. मंत्र्यांच्या बायकांना राज्यभर फिरून एन्जॉय करायचं होतं. या सगळ्या स्त्रिया आपली ओळख लपवून महाराष्ट्र फिरतात. तेव्हा त्यांना लक्षात येतं की भ्रष्टाचार किती होतो. तेव्हा त्या ठरवतात की पुढचा शपथविधीच होऊ द्यायचा नाही. त्यामुळे ८ महिला आणि ८ तरुणी अशा १६ महिला होत्या.

आज वाचनाची आवड कमी का झाली आहे?

सध्या ऐकणं वाढलं आहे. पूर्वी फक्त रेडिओ होता. आता इंटरनेट, व्हॉट्सअॅप, स्मार्टफोन आलेत. युट्यूब, नेटफ्लिक्स आलंय. त्यामुळे प्रत्यक्ष पुस्तकांकडे ओढा कमी झाल्यासारखं आपल्याला वाटतं. पण तसं नाहीये. अजूनही पुस्तकांच्या आवृत्त्यांना मागणी आहे. बघणं आणि ऐकणं वाढलं आहे. प्रत्यक्ष पुस्तक घेण्यापेक्षा मोबाईलवर वाचलं जातं. त्यामुळे ज्ञानाची पातळी खाली न जाता उलट वर गेली आहे.

लोकं गेट वे ऑफ इंडियासारखं दूरदर्शन बघायला यायचे!

दूरदर्शनला हौस म्हणूनच गेलो होतो. त्या काळात ते नवीन माध्यम होतं. गेट वे ऑफ इंडियासारखं लोकं दूरदर्शन बघायला यायचे. ते नवीन माध्यम बघायला मिळत होतं. मी ग्राफीक्स डिझायनर होतो. पण बाजूलाच स्टुडिओ होते. नाटकं, मैफिली शूट व्हायच्या तिथे. दूरदर्शनच्या टॉवरखाली कल्चरल हब होतं. तेव्हा तिथे चहा घ्यायला स्मिता पाटील, भक्ती बर्वे, बी पी सिंग हे स्ट्रगलिंग होते. तेव्हा तिथून बाहेर पडणारा मी पहिलाच होता. कलेच्या क्षेत्रात काम करण्यासाठीच दूरदर्शन सोडलं. पहिली फिल्म आर्ट डिरेक्टर म्हणून केली. ती तिथल्याच कामामुळे मिळाली.

मुंबईतला कामाठीपुरा हा मिनी भारत आहे!

मुंबईनं मला जन्म दिला. सगळ्यांना मुंबईत येऊन करिअर करायचं असतं. आमचा जन्मच मुंबईत झाला. कामाठीपुऱ्यात. ज्या गोष्टी समजायला समज यावी लागते, त्या गोष्टी आम्हाला जन्मापासूनच समजल्या. कामाठीपुरा हा मिनी भारतच आहे जणू. तो जरी मुंबईतला टाकाऊ स्लम असला, तरी मला कामाठीपुऱ्यानं खूप काही दिलं. त्यामुळे मी कुठेही लपवत नाही की माझा जन्म तिथे झाला आहे.

पाहा संपूर्ण मुलाखत – 

सिनेसृष्टीला अजरामर मराठी सिनेमे देणारे प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासोबत थेट गप्पा… कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि लाइव्ह मध्ये त्यांची उत्तरं मिळवा! | #MyMahanagar

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Friday, January 4, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -