घरनवी मुंबईखारघर दुर्घटना : ७ हजार कॉल आले, ६५० जणांवर उपचार

खारघर दुर्घटना : ७ हजार कॉल आले, ६५० जणांवर उपचार

Subscribe

५० श्री सदस्‍य विविध रुग्‍णालयांत दाखल, १४ जणांचा उष्‍माघाताने बळी,नेत्यांच्या भाषणबाजीवर श्री सदस्य नाराज, प्रशासनाच्‍या सतर्कतेमुळे बळींचा आकडा आटोक्‍यात

खारघर येथे १६ एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील बळींचा आकडा नेमका किती? बळी उष्माघाताचे की चेंगराचेंगरीचे? कार्यक्रमात किती श्री सदस्यांना त्रास झाला? याविषयी सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे. अशातच या कार्यक्रमाला उपस्थित शेकडो नव्हे तर हजारो श्री सदस्यांना त्रास झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. ४२ डिग्री तापमानाच्या रखरखत्या उन्हात बसलेल्या श्री सदस्यांना त्रास झाल्याचे तब्बल ७००० हून अधिक कॉल प्राप्त झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’ला दिली आहे. सुरुवातीला त्रास जाणवू लागलेल्या श्री सदस्यांवर कार्यक्रमाच्या जवळच आमराईखाली उभारलेल्या तंबूत उपचार केल्याने बळींची आकडा आटोक्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

तर ५० हून अधिक अत्यवस्थ रुग्णांना तातडीने पाठीमागील बाजूस असलेल्या टाटा रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु येथे कर्करोगावर उपचार होत असल्याने तेथील डॉक्टरांची एकच तारांबळ उडाली. त्यानंतर या रुग्णांना वाशी आणि कामोठेतील एमजीएम, अपोलो, डीवाय पाटील आदी नजीकच्या रुग्णालयांत श्री सदस्यांना तात्काळ हलविण्यात आले. दुर्दैवाने त्यापैकी काही जणांना मृत अवस्थेतच रुग्णालयात आणावे लागले. अशी धक्कादायक माहिती त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार्‍या एका अधिकार्‍याने दिली. आतापर्यंत खारघरच्या दुर्घटनेत १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खारघरच्या भव्य सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते १६ एप्रिल रोजी प्रदान करण्यात आला. जेव्हा शासकीय कार्यक्रम असतो तेव्हा त्याचे नियोजन केलेले असते. त्यानुसार सकाळी ११ वाजता सुरू होणारा कार्यक्रम अवघ्या ९० मिनिटांत संपणार होता. मात्र कार्यक्रम नियोजित वेळेच्या ४० मिनिटे उशिरा सुरु झाला. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रास्ताविक ५ मिनिटे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ मिनिटे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ५ मिनिटे, गृहमंत्री अमित शहा १० मिनिटे, समारोप १ मिनिट, तर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ११ मिनिटांची वेळ देण्यात आली होती.

प्रत्यक्षात समोर अफाट गर्दी पाहिल्यानंतर सर्वच राजकीय नेते खुलले आणि मुनगंटीवारांपासून सर्वच नेत्यांनी भाषणबाजीला दुप्पट-तिप्पट वेळ घेतला. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे भाषण ३६ मिनिटांचे झाले. कार्यक्रम दुपारी १.३५ वाजता संपला असला तरी प्रत्यक्षात तो ११ वाजण्याच्या आसपास सुरू झाला होता. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती उशिरा झाल्यानंतरही त्या कार्यक्रमात सचिनदादा धर्माधिकारी यांचेही भाषण झाले. श्री सदस्यांना सचिनदादांसह आपले गुरू डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचेच भाषणवजा प्रवचन ऐकण्यात रस होता, मात्र नेत्यांनी भाषणबाजीची हौस भागवून घेतल्याने बहुसंख्य श्री सदस्यांनी कार्यक्रमानंतर नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

कोणताही शासकीय कार्यक्रम असल्यावर काहीतरी विपरीत घडण्याची शक्यता गृहित धरून सर्वतोपरी काळजी घेण्यात आली होती. कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडल्याचे वाटून उपस्थित अधिकार्‍यांनी दुपारी १.४५ वाजता सुटकेचा निःश्वास टाकला, परंतु एकाच वेळी रुग्णवाहिकांचे सायरन दुपारी २.३० वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाजू लागल्याने काहीतरी अनर्थ घडल्याचे लक्षात आले आणि सर्वच अधिकार्‍यांच्या पायाखालची वाळू सरकली. एका प्रत्यक्षदर्शीने ‘आपलं महानगर’ला दिलेल्या माहितीनुसार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे भाषण सुरू असतानाच पहिली रुग्णवाहिका मोकळ्या रस्त्यावरून कार्यक्रमस्थळी आली. त्यानंतर पाठोपाठ आलेल्या एकेका रुग्णवाहिकेतून उष्माघाताचा आणि इतर त्रास जाणवू लागलेले ५ ते ६ रुग्ण उपचारासाठी नेण्यात येत होते.

सुरुवातीला त्रास जाणवू लागलेल्यांवर कार्यक्रमाच्या ठिकाणी आंब्याच्या झाडांखाली उभारण्यात आलेल्या तंबूत सुमारे ६५० श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून त्यांना पाठीमागील बाजूस असलेल्या टाटा रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु त्या रुग्णालयात कर्करोगावर उपचार होत असल्याने तेथील डॉक्टरांची एकच तारांबळ उडाली. त्यानंतर रुग्णांना वाशी आणि कामोठे येथील एमजीएम, अपोलो आणि डीवाय पाटील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र कार्यक्रमासाठी आठवडाभर कार्यरत असणार्‍या विविध खाताच्या कर्मचार्‍याने समय सुचकता दाखवल्याने १४ रुग्णांचा मृत्यू झाला. अन्यथा शेकडो रुग्ण उष्माघाताने दगावले असते, असे अनेक अधिकार्‍यांचे, वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. १४ उष्मघाताने दगावलेल्या रुग्णांचा वैद्यकीय अहवाल हा या पूर्वी असणार्‍या आजाराशी निगडीत असल्याने १४ जणांचा दुदैवी मृत्यू झाला, असे सांगण्यात येते.

=जवळपास ३६० एकर जागेवर पार पडलेल्या या सोहळ्यात २० लाखांहून अधिक श्री सदस्यांची गर्दी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी सरकारच्या मते गर्दीचा आकडा सुमारे १० लाख इतका आहे, तर आयबीने (इंटेलिजन्स ब्युरो) सुमारे ८ लाख नागरिक खारघरला जमल्याचे म्हटले आहे.

=उष्माघाताचा त्रास उपस्थितांमध्ये काही जणांना झाल्याची पहिली माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून घटनास्थळाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

=उन्हाची वेळ आणि लाखोंची गर्दी लक्षात घेऊन सोहळ्याच्या ठिकाणी सुमारे ६० हून अधिक रुग्णवाहिकांबरोबर ३५० हून अधिक डॉक्टर आणि सहाय्यक असे शेकडो आरोग्य कर्मचार्‍यांना तैनात करण्यात आलेले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -