घरठाणेभिवंडी मनपा प्रशासनातर्फे जर्जर इमारतीवर युध्दपातळीवर होणार कारवाई

भिवंडी मनपा प्रशासनातर्फे जर्जर इमारतीवर युध्दपातळीवर होणार कारवाई

Subscribe

इमारती तात्काळ रिकाम्या करण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन

तालुक्यातील वळपाडा येथे नुकतीच इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार भिवंडी महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींवर तात्काळ कार्यवाही करुन दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरीता प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी संबंधित अधिका-यांची तातडीने बैठक आयोजित करुन याबाबत कार्यवाही करणेचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपआयुक्त दिपक झिंजाड यांच्यासह प्रभाग अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. सध्या शहरात होणा-या अवकाळी पाऊस आणि साधारणतः पावसाळ्यामध्ये शहरातील धोकादायक, अतिधोकादायक आणि जास्तीत जास्त अत्यंत जर्जर किंवा राहण्यालायक नसणा-या जीर्ण अशा इमारती कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणांत घडत असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी जिवीत या वित्तहानी होत असते. या गंभीर घटना टाळण्यासाठी जुन्या व मोडकळीला आलेल्या इमारतींवर पावसाळ्यापूर्वी करावयाची कार्यवाहीबाबत आज मनपा प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी मनपा प्रशासन व पोलिस प्रशासनाची मदत घेऊन तातडीने कार्यवाही करणेचे आदेश दिलेले आहेत. या बैठकामध्ये जर्जर किंवा जीर्ण झालेल्या प्रभाग समिती १ ते ५ अंतर्गत असलेल्या अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतीबाबतचे एक धोरण ठरवून, अशा इमारतीवर कार्यवाही करणेचे बैठकीमध्ये निश्चित करण्यांत आले.

आयुक्त म्हसाळ पुढे असे म्हटले की, प्रथम प्राधान्याने अशा इमारतींवर कारवाई करतांना पहिल्या टप्यांमध्ये सबंधितांचा यीज पुरवठा-पाणी पुरवठा खंडीत करणे, त्यांनतर तेथील नागरीक, संबंधित पुढारी, नगरसेवक यांचे मनपा व पोलिस प्रशासनाच्यावतीने महत्व पटवून त्यांचे मत परिवर्तन करणे. त्यानंतर स्वतःहून इमारती खाली करण्याचे आवाहन करणे आणि इमारत राहण्यालायक नसल्याचा बॅनर लावणे, अशा इमारतीमधील रहिवासींना इमारत खाली करण्याच्या विहित मुदतीनंतरही खाली करण्यास असमर्थता दर्शविल्यांतर या इमारतीमधील रहिवासींना नाईलाजास्तव मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम २६८ अन्वये पोलिस प्रशासनाच्या मदतीने सदरची इमारत रिकामी करण्याची कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भिवंडी मनपा क्षेत्रातील नागरीकांच्या जिवीतास व वित्तीय हानी निर्माण होऊ नये या उद्देशाने आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्याने आता या प्रकरणी जर्जर इमारतीमध्ये राहणा-या रहिवासींनी स्वतः हून इमारती रिकाम्या करुन देऊन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन नागरीकांना केले आहे.

- Advertisement -

अत्यंत जर्जर व जीर्ण झालेल्या अशा इमारती निष्काशित करण्यांची कारवाई प्रथम प्राधान्याने करण्यांत यावी आणि महानगरपालिकेच्या अशा विविध कारवाईसाठी व नागरीकांचे जिवीत व वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने पोलिस प्रशासनलाची मदत घेऊन त्याअनुषंगाने सी-१ वर्गीकरण केलेल्या अतिधोकादायक इमारतींवर युध्दपातळीवर विशेष मोहीम राबवून रिकाम्या करणेबाबत अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी संबंधित प्रभाग अधिकारी, तांत्रिक अभियंता यांना आदेश दिले असून, यासंदर्भात उपआयुक्त दिपक झिंजाड यांनी कार्यवाही करण्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन केले. सदर बैठकीस महानगरपालिकेचे विधी अधिकारी अनिल प्रधान, शहर विकास विभाग प्रमुख शाकीब खरबे, प्रभाग अधिकारी फैसल तातली, सोमनाथ सोटे, सुदाम जाधव, गिरीश घोष्टेकर, कार्या. अधिक्षक माणिक जाधव आणि सहाय्यक विधी अधिकारीही उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -