घरमुंबईश्वान मालकांनो सावधान!

श्वान मालकांनो सावधान!

Subscribe

३२ व्यक्तींचे पथक तैनात; तीन दिवसात १६ मालकांना दंड

घरातील पाळीव प्राण्याला घेऊन फिरायला गेल्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणे, रस्ते वा पदपथांवर घाण करतात. यामुळे सार्वजनिक जागा अस्वच्छ होत असल्याने पालिकेने श्वान मालकांवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डी विभागात याकरिता ३२ व्यक्तींचे पथक तैनात करण्यात आले असून, तीन दिवसात १६ मालकांकडून दंड वसूल केला आहे.

विशेष जनजागृती मोहीम

महापालिकेच्या ‘डी’ विभागामध्ये ऑगस्ट क्रांती मैदान, गिरगाव चौपाटी, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रॅण्ट रोड, चर्नी रोड, ताडदेव, गोपाळराव देखमुख मार्ग (पेडर रोड), लक्ष्मीबाई जगमोहनदास मार्ग (नेपियन्सी रोड) इत्यादी महत्वाच्या ठिकाणांचा व परिसरांचा समावेश होतो. या परिसरात पाळीव प्राण्यांची संख्या देखील मोठी आहे. तसेच पाळीव प्राण्यांसह सार्वजनिक ठिकाणी फिरायला येणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. पाळीव प्राण्यांद्वारे सार्वजनिक ठिकाणी घाण होत असल्याच्या काही तक्रारी महापालिकेच्या विभाग कार्यालयाद्वारे प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने याबाबत विशेष जनजागृती मोहीम विभाग कार्यालयाद्वारे सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

३ दिवसांत १६ व्यक्तींकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल

या मोहिमेसाठी ३२ व्यक्तींचे पथक कार्यरत आहे. या व्यक्ती ‘डी’ विभागातील विविध ठिकाणी फिरुन व पाहणी करुन पाळीव प्राण्यांच्या मालकांशी संवाद साधत आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाळीव प्राण्यांनी रस्त्यावर विष्ठा उत्सर्जित केल्यास अशी विष्ठा उचलण्यासाठी ‘शिट लिफ्टर’ हे उपकरण वापरुन विष्ठा कशी उचलावी व ती परिसरातील कचऱ्याच्या डब्यात कशी टाकावी? याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जात आहे. तसेच कुत्र्याने घाण केलेली असल्यास ‘बृहन्मुंबई स्वच्छता आणि आरोग्य उपविधी – २००६’ नुसार प्रत्येकवेळी रुपये ५०० एवढा दंड देखील करण्यात येत आहे. यानुसार गेल्या ३ दिवसांत १६ व्यक्तींकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांनी दिली आहे.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -