घरमहाराष्ट्रनाशिकमार्क्सचं पुस्तक सापडलं तरी नक्षलवादी ठराल

मार्क्सचं पुस्तक सापडलं तरी नक्षलवादी ठराल

Subscribe

नाशिकमधील राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केली भीती; सध्याचा काळ मौनाचा

सावधान..घरात मार्क्सचं पुस्तक सापडलं तरी तुम्हाला नक्षलवादी ठरवण्यापर्यंत मजल गेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण म्हणतो फक्त, प्रत्यक्षात तुमच्या जगण्यालाच कुंपणं घातली जात आहेत. साहित्यिक अभिव्यक्तीचं तर विचारूच नका!.. या शब्दांत डॉ. नागनाथ कोथापल्ले यांनी सध्याच्या वातावरणाबद्दल भीती व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबादचे कुलगुरुपदी राहिलेल्या डॉ. कोतापल्ले यांनी देशातील साहित्यिकांच्या गळचेपीबाबत भीती आणि चिंंता व्यक्त केली. आंबेडकरवादी विचारवंत डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकेवरून वादळ उठलेले असताना कोतापल्ले यांनी हे विधान केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा जोतीराव फुले अध्यासनातर्फे नाशिक येथील कर्मवीर शांतारामबापू वावरे महाविद्यालयात मंगळवारी, ५ फेब्रुवारीला ‘साहित्यिक जोतीराव फुले’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. कोतापल्ले बोलत होते. सध्याचा काळ मौनाचा आहे. आपण काय बोलावं, काय बोलू नये, यावर बंधने पडत आहेत. तात्विक वैचारिक मतभेद समजण्यासारखा आहे. मात्र त्यातून प्रसंगी कायद्याचा गैरवापर करण्यापर्यंत परिस्थिती जाते. या सारखे दुर्दैवं कोणते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

मौनी होऊ नका

बहुविधतता हे वैशिष्ठ्य असलेल्या समाजावर आज पुन्हा मौनाचेच राज्य आले आहे, असे सांगत ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांनी सद्यस्थितीवरील मौन सोडले. ‘मौन सर्वार्थ साधनम’ असे सांगत समाजातील वास्तवावर बोलू नये. चुका दाखवू नयेत. कर्मकांडे आहे तशीच स्वीकारावीत, असेच बहुजनांवर सातत्याने बिंबवले गेले आहे. ‘बोलू नका’ हे सांगणार्‍यांच्या विरोधात जोतीराव फुले यांनी ‘बोला’ असे म्हणत संघर्ष उभा केला. मौनाच्या या काळात बोलणे अतिशय अवघड आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, साहित्यिकांनो भूमिका घेणे थांबवू नका. मौनी होऊ नका. लोकांची भाषा समजून त्यांच्या भाषेत व्यक्त व्हा, असेही त्यांनी साहित्यिकांना आवाहन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -