घरमुंबईगरिबांच्या भविष्यासाठी झटणारी 'रॉबिन हूड आर्मी'!

गरिबांच्या भविष्यासाठी झटणारी ‘रॉबिन हूड आर्मी’!

Subscribe

रॉबिन हूड या दानशूर व्यक्तीकडून प्रेरीत होऊन 'रॉबिन हूड आर्मी' ही गरिबांसाठी कार्य करत आहे.

भारत देश हा विकसनशील देशांमध्ये गणला जातो. आपल्या देशामध्ये तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे, तसेच कॉर्पोरेट क्षेत्रही वाढत चालले आहे. तरीही इथल्या एका वर्गाच्या भूकेचा आणि संस्कारांचा प्रश्न आजही तसाच अनुत्तरित आहे. परंतु उल्हासनगर, कल्याण, बदलापूर मधील अतिदुर्गम भागातील मुलांच्या भवितव्यासाठी आजही झटणारे काही रॉबिनहुड्स आहेत. ‘रॉबिनहुड’ हा गरिबांचा कैवारी होता. गरिबांना मदत करणे हा तो त्याचा धर्म मानत असे, अशा जगप्रसिद्ध दानशूर व्यक्तीच्या कार्याने प्रेरित होऊन नील घोष आणि आनंद सिन्हा यांनी २६ ऑगस्ट २०१४ साली दिल्लीत रॉबिन हूड आर्मीची स्थापना केली. धर्मादाय अंतर्गत त्याची नोंदणी करण्यात आली होती. रॉबिनहुड श्रीमंतांना लुटून गरिबांना मदत करत असे, पण रॉबिन हूड आर्मीमध्ये लुटमार नसून मोठ्या कार्यक्रमानिमित्त तसंच हॉटेल्समध्ये उरलेलं अन्न घ्यायचं आणि गरजूंमध्ये वाटायचं अशी त्यांची पद्धत होती. भुकेल्या नागरिकांच्या सेवेसाठी ही संस्था सुरू करण्यात आली आहे.

रॉबिन हूड आर्मी नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, जयपूर, जबलपूर, पानिपत, गुरगाव, पुणे, देहरादून, फरीदाबाद अशा अनेक शहरांसह श्रीलंका, चिली, युगांडा, पेरू अशा अन्य १३ देशांमध्ये काम करते. हिरव्या रंगाचा टी-शर्ट ही या कार्यकर्त्यांची ओळख आहे. आज देशातील २६४ शहरांमध्ये ही आर्मी काम करताना दिसत आहे.

- Advertisement -

झोपडपट्टी, स्टेशनवरील मुलं, भटके मुलं, आदिवासी पाड्यातील मुलं रॉबिन हूड आर्मीचे स्वयंसेवक त्यांना शोधून काढतात. रिकाम्या पोटी ज्ञान मेंदूत शिरत नाही हे या आर्मीने जाणलं आहे. म्हणूनच विविध हॉटेल्स, लग्न समारंभ, पार्ट्या तसेच दायाळू व्यक्तींकडून उरलेलं अन्न ही आर्मी संपर्क साधून गोळा करत असते आणि शनिवार-रविवारी वस्त्यांमध्ये त्याचे वाटप करते. हे करत असतांना त्या मुलांना कपडे, दात, नखे, केस यांची स्वच्छता ठेवण्याची देखील सवयी लावते. त्यांना चांगले राहण्याचे, बोलण्याचे, अभ्यासाचे, वागण्याचे संस्कार देते. कला, खेळ संबंधित प्रशिक्षणही रॉबिन हूड आर्मीकडून दिले जाते.

मिरल आणि रितिका मित्तल, क्रितिका तिवारी या सुशिक्षित तरुणींच्या मार्गदर्शनाखाली दीपक रामरख्यानी, शितल शर्मा, अनिकेत, अभिषेक शर्मा, शशी यादव, गणेश डोहळे असे तरुण आपले नोकरी आणि शिक्षण सांभाळून उरलेल्या वेळात हे पुण्यकर्म करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यामध्ये अवघा ९ वर्षांचा प्रतीक शुक्लाही त्यांना मदत करतो! उल्हासनगरच्या संजय गांधी नगर, कुष्ठ वसाहती, म्हारळ गावातील झोपडपट्टी, अंबरनाथचे स्वामीनगर, नागपंथी डवरी समाजाच्या, भटक्या समाजाच्या वस्त्या, कल्याणच्या चिंचपाडा, डम्पिंग ग्राउंड विभाग या वस्त्यांमधून ही आर्मी आपले काम निरपेक्षपणे करीत आहे. नव्या पिढीचे भरणपोषण आणि चांगले संस्कार देण्याचे काम ही ‘रॉबिन हूड आर्मी’ करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -