घरमहाराष्ट्रनाशिकसरकार कर्ज माफ करेल काय रे भाऊ!

सरकार कर्ज माफ करेल काय रे भाऊ!

Subscribe

औरंगपूरच्या आत्महत्याग्रस्त खालकर कुटुंबियांपुढे अडचणींचा डोंगर

ज्ञानेश उगले

‘बँकेच्या नोटीसीने घरधनी हादरला होता. वसुलीला येणार्‍यांनी जप्तीची धमकी दिली होती. रात्रीच्या वेळी कर्जाची नीट यादी केली अन पहाटे उठून नवर्‍याने घराजवळच्या लिंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेतला. कर्जमाफीच्या निकषांत आम्ही बसलो नाही. घरासमोर द्राक्ष बाग उभी आहे. तिच्यासाठी भांडवल नाहीये. मुलगा पेट्रोलपंपावर टेंपररी कामावर जातोय. त्यावरच घर चाललंय. सरकार आमचं कर्ज माफ करेल काय रे भाऊ!..हिराबाईंचं बोलणं काळीज चिरत होतं..त्यांचे पती भाऊसाहेब शिवाजी खालकर (वय ४४) यांनी शेतीतील नुकसान अन कर्जामुळे आलेल्या नैराश्याने आत्महत्या केली. ७ मार्चला खालकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेला अजून महिना उलटायचाय. त्यांच्या आठवणीने खालकरांचं घर, शेत अन् शिवार धुमसतंय..

- Advertisement -

एका वर्षात १०९ आत्महत्या

फलोत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या नाशिक जिल्ह्यात २०१२ मध्ये वर्षभरात ५ आत्महत्या झाल्या होत्या. ते प्रमाण वाढत जाऊन २०१८ मध्ये १०९ पर्यंत पोहोचलंय. २०१९ मध्ये मार्च अखेरपर्यंत १६ शेतकर्‍यांनी मरणाला जवळ केलंय. मात्र त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाची वाताहात थांबायला तयार नाही. निफाड तालुक्यातील औरंगपूर येथील भाऊसाहेब खालकर यांच्या कुटुंबाची स्थिती प्रातिनिधिक मानता येईल, अशीच भकास नाशिकच्या शिवाराची अवस्था झाली आहे.

मोठी आशा होती..

निफाड तालुक्यातील औरंगपूर येथील शिवारात वडिलोपार्जित दोन एकर जमिनीत सोयाबीन अन कांद्याचे पिक घेणारे भाऊसाहेब खालकर यांनी चार वर्षांपूर्वी द्राक्ष बाग लागवड करायचे ठरवले. द्राक्षशेतीच्या उत्पन्नातून आपली ओढाताणीची परिस्थिती पालटेल. मुलीचं लग्न करता येईल. मुलाचं शिक्षण पूर्ण करता येईल हे स्वप्न उराशी बाळगून भाऊसाहेब पत्नी हिराबाईसह शेतात राबत होते. बाग उभी करण्यासाठी सायखेड्याच्या देना बँकेचं कर्ज घेतलं. पुढे तेही कमी पडलं, तर ओझरच्या सरस्वती सहकारी बँकेचंही कर्ज घेतलं. पहिले दोन वर्ष बाग उभी करण्यात गेले. त्यातच जवळ असलेल्या भांडवल व बायकोच्या दागिण्यांतून मुलीचं लग्न केलं. तिसर्‍या वर्षी उत्पादन हाताशी येणार तर ऐन काढणीच्या अवस्थेत झालेल्या गारपिटीने डोळ्यादेखत होत्याचं नव्हत करून टाकलं.

- Advertisement -

संकटांशी लढाई

चौथ्या वर्षी कसं तरी भांडवलाला पाहुणे व मित्रांकडून पैसे जमवून पुन्हा नव्या उमेदीने भिडले. २०१८ मध्ये खर्च निघेल इतकाही दर मिळाला नाही. या काळात औषध दुकानदारांकडून घेतलेल्या उधारीचंही बिल थकलेलं होतं. २०१९ मध्ये खरड छाटणी वेळी बागेला पाण्याचा ताण बसला होता. त्यामुळे माल कमी निघाला. दोन एकर द्राक्षबागेतून अवघा ७० क्विंटल माल निघाला. तोही १२ रुपये किलोच्या दराने विकावा लागला. यातून जे काही लाख भर रुपये आले त्यातील ५० हजार औषध दुकानदाराचे दिले. उरलेले पुन्हा उसनवारीवर घेतलेल्यांचे दिले. यात बँकेचं, सोसायटी कर्ज तसंच राहिलं. सरकारनं कर्जमाफी जाहीर केली. मात्र त्याला अनेक निकषांचे माप लावले. आधी पैसे भरा अन मग कर्जमाफी मिळेल. असा उफराटा निकष पाळण्यासाठी आधी जवळ पैसे तर पाहिजे. मात्र, तसं काहीच नसल्याने भाऊसाहेब खालकर यांच्यासारखे असंख्य शेतकरी आधीच मनातून खचलेले होते. त्यात बँकांचे वसुली पथक गाड्या घेऊन शेतात, घरात येत होते. जमिनीची जप्ती करू, अशी धमकी देत होते. बँकेची नोटीस आल्यापासून भाऊसाहेब अस्वस्थ झाले होते. दुकानदार, देणेकरीही तगादा लावीत होते. त्यातच आदल्या दिवशी बँकेचं पथक घरी येऊन गेल्याचं निमित्त झालं. निराशेने घेरलेल्या खालकरांनी गोठ्यातील दोर उचलला. त्याचा फास तयार केला. त्या आधी डोक्यावर असलेल्या कर्जाची यादी असलेली चिठ्ठी लिहिली. त्यावर माझ्या आत्महत्येसाठी माझ्या घरच्यांना दोषी धरू नये, अशी ओळही लिहिली. उत्तररात्री घरासमोरच्या लिंबाला दोर बांधून गळफास अडकवून स्वत:ला मृत्यूच्या दाढेत ढकलून दिलं.

कुटुंबासमोर प्रश्नांचा डोंगर

या संकटाने पत्नी हिराबाई, इयत्ता बारावी पर्यंत शिकलेला १९ वर्षांचा मुलगा प्रवीण यांच्या समोर अनेक प्रश्न वाढवून ठेवले आहेत. प्रवीणने महिना ७ हजाराच्या पगारावर सायखेड्याच्या पेट्रोलपंपावर नोकरी धरली आहे. त्यावर आजी, आजोबा आणि आई सदस्य असलेलं कुटुंब सावरण्याचा तो प्रयत्न करतोय. देणं तर सगळंच द्यायचंय. प्रशासकीय यंत्रणेनं शेतकरी आत्महत्या भाऊसाहेब खालकर यांचं मरण मान्य केलं आहे. मात्र, मृत्यूनंतर सरकारकडून मिळणारी १ लाखांची मदत अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाहीय. याही स्थितीत ‘सरकार खरंच कर्जमाफी करील का?’, अशी भाबडी आशाही त्यांच्या त्या बोलण्यातून व्यक्त होतेय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -