घरमहाराष्ट्रमध्यवर्ती सुसज्ज रुग्णालयाचे फक्त स्वप्नच!

मध्यवर्ती सुसज्ज रुग्णालयाचे फक्त स्वप्नच!

Subscribe

औद्योगिक जिल्हा अशी बिरुदावली मिरविणार्‍या रायगड जिल्ह्यात मध्यवर्ती सुसज्ज रुग्णालयाची निर्मिती होणार, हे काही वर्षांपूर्वी दाखविण्यात आलेले स्वप्न अद्याप स्वप्नच राहिले आहे. अपघातग्रस्त, गंभीर आजारी रुग्णांचे मात्र यामुळे हाल होत आहेत. या जिल्ह्यात सुसज्ज सार्वजनिक रुग्णालय असावे, ही मागणी फार जुनी आहे. जेव्हा औद्योगिकीकरणाचा ओघ या जिल्ह्यात सुरू झाला तेव्हा अशा रुग्णालयाबाबत सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या. मोठाले कारखाने आले, पण त्यांनी त्यांच्या आवारातच आपले सुसज्ज दवाखाने थाटले. अर्थात हे नावालाच सुसज्ज आहेत, हा भाग वेगळा. या कारखान्यांचे मुंबई, पुण्यातील मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांबरोबर करार असल्यामुळे त्यांचे कामगार, अधिकारी मोठ्या उपचारासाठी तेथे पोहचतात. ज्यांनी या कारखान्यांसाठी कवडीमोल किमतीने जागा दिल्या त्यांना मात्र कारखान्यांच्या रुग्णालयात थारा दिला जात नाही. सरकारी रुग्णालयांचा दर्जा यथातथाच असल्याने गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी मुंबई किंवा पुणे येथे पोहचावे लागते. यात त्यांचा बराचसा पैसा व वेळ वाया जातो.

सन 1990 मध्ये नागोठणे येथील तत्कालीन इंडियन पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, म्हणजेच आयपीसीएल (आता रिलायन्सचा एनएमडी) कारखान्याच्या गॅस क्रॅकर विभागात प्रचंड स्फोट होऊन 35 हून अधिक जणांचा बळी गेला. या अपघातानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नागोठण्यात भेट दिली तेव्हा रुग्णालयाबाबत त्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यांनी तत्काळ उद्योग समुहांच्या मदतीने सुसज्ज रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील असा शब्द दिला. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील मोठ्या उद्योगसमुहांच्या वरिष्ठांना त्यांनी चर्चेसाठी मुंबईत पाचारणही केले. या प्रकारच्या किमान पाच-सहा बैठका झाल्या. पवार यांनी लक्ष घातल्यामुळे रुग्णालयाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. मध्यवर्ती रुग्णालयासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणे ते वडखळ दरम्यान जागा शोधण्याचे निश्चित झाले. मोफत जमीन देण्यासाठी काही दानशूरही पुढे आले. परंतु पुढे काही घडलेच नाही आणि काळाच्या ओघात हा विषयही थांबला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -