घरमनोरंजनदिवसभर पुष्कर श्रोत्री

दिवसभर पुष्कर श्रोत्री

Subscribe

एकदा का एखाद्या मराठी नाटकाने वेग घेतला तर हमखास हजार प्रयोगांची हमी निर्माता देत होता. आता पन्नास प्रयोग होतील की नाही याची खात्री देता येत नाही. एकतर प्रेक्षक दुपारच्याच प्रयोगाला येणे पसंत करतात. त्यातून शनिवार, रविवार असेल तर नाटकाला बर्‍यापैकी बुकींग होते. त्यामुळे विक्रमाचे जे गणित असते ते पूर्णपणे थांबलेले आहे. त्यातूनही आयोजनात काही विशेष असेल तर प्रेक्षक इतरवेळीही वेळ द्यायला तयार असतात. वाडा चिरेबंदी आणि त्याचे अन्य दोन भाग एकाच दिवशी सादर केले तर प्रेक्षकांनी अशा उपक्रमांना भरभरुन दाद दिलेली आहे. प्रशांत दामले याने काही वर्षांपूर्वी आपली भूमिका असलेली नाटके एकाच दिवशी लावली होती. त्यावेळी त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. असा योग प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला येईलच असे नाही, पण पुष्कर श्रोत्री याने मात्र मे महिन्यात हे धाडस करण्याची तयारी दाखवलेली आहे. पुष्कर श्रोत्री शो असे काहीसे त्याचे नाव असणार आहे.

पुष्कर तसा विनोदी कलाकार म्हणून ओळखला जातो. गंभीर आणि विनोदी अशी त्याची दोन्ही रूपे रंगमंचावर पहायला मिळालेली आहेत. योगायोग म्हणजे त्याची भूमिका असलेले हसवा फसवी, आम्ही आणि आमचे बाप, अ परफेक्ट मर्डर ही त्याची तिन्ही नाटके सध्या व्यावसायिक रंगमंचावर सुरू आहेत. त्याचा कामाचा व्याप लक्षात घेता एकाच दिवशी या तिन्ही कलाकृती एकत्रितपणे पहायला मिळणे तसे कठीण पण पुष्करने हा योग जुळवून आणलेला आहे. सकाळी-दुपारी-रात्री एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग दीनानाथ नाट्यगृहात करण्यात येणार आहेत. प्रेक्षकांना या तिन्ही नाटकांचा एकत्रित आनंद घेता यावा यासाठी विशेष सवलतही देण्यात येणार आहे. चाहत्यांना दिवसभर पुष्कर श्रोत्रीच्या वैविध्यपूर्ण अभिनयाचा आनंद घेता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -