घरफिचर्स'धर्मनिष्ठेचा महामेरू'..छत्रपती संभाजी महाराज!

‘धर्मनिष्ठेचा महामेरू’..छत्रपती संभाजी महाराज!

Subscribe

मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणजे मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास. रोमारोमात ज्यांचे नाव अखंड घ्यावे, असा हा राजा म्हणजे छत्रपती शिवरायांचे सर्वात मोठे पुत्र होते. शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे ते ज्येष्ठ पुत्र. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी ९ वर्षे राज्य केले. मराठा साम्राज्य हे मुघल साम्राज्य तसेच सिद्दी आणि पोर्तुगीज यासारख्या अन्य शेजारील शासकांविरुद्ध लढा देत उभे होते. संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावरचा. राजे अवघे २ वर्षांचे असताना त्यांच्या आई सईबाई यांचा मृत्यू झाला. आईविना पोर सांभाळायची जबाबदारी त्यांच्या आजी, शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब जिजाऊ यांनी स्वीकारली. लहानपणापासून संभाजी महाराज चातुर्यवान होते. शिवाजी महाराज यांनी कोकणमध्ये मराठा साम्राज्य वाढीसाठी प्रचितगडवर ताबा मिळवला. त्यात पिलाजीराव शिर्के यांची मदत झाली आणि मराठा साम्राज्याला कोकणची वाट मोकळी झाली. त्यात झालेल्या तहानुसार संभाजीराजे यांचा विवाह पिलाजीराव यांच्या कन्या येसूबाई यांच्याशी झाला.

१६८९ च्या सुरुवातीस संभाजीराजे यांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांची बैठक कोकणात संगमेश्वर येथे आयोजित केली होती. १ फेब्रुवारी १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकरब खान संभाजी महाराज यांच्या ३००-४०० च्या तुकडीवर आपले ३००० चे सैन्य घेऊन संगमेश्वराजवळ चालून आला. मराठ्यांच्या आणि शत्रूच्या सैन्यात मोठी चकमक उडाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. मराठ्यांचा राजा वैरांच्या मगरमिठीत सापडला. पकडलेल्या संभाजी महाराज व कवी कलश यांना बहादूरगडमध्ये नेण्यात आले, जेथे औरंगजेबाने त्यांची विदूषक कपडे घालून धिंड काढली. जितके म्हणून हाल करता येतील तितके हाल औरंगजेबाने संभाजी महाराजांचे केले. संभाजी महाराजांना मराठ्यांसह आपल्या किल्ले, खजिना मुघल साम्राज्याला बहाल करण्यास सांगण्यात आले, पण झुकेल तो मराठा राजा कसला. ‘मोडेन पण वाकणार नाही‘ चा नारा देत मराठा साम्राज्याचा हा राजा मुघलांचे अत्याचार सोसत राहिला. सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.

- Advertisement -

संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याचा विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या १५ पट असणार्‍या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराज यांनी एकहाती लढा दिला. संभाजी महाराज यांनी गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करत औरंगजेबाला जेरीस आणले होते. राजांनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. त्यातले एकही युध्द महाराज हरले नाहीत. महाराज असे एकमेवाद्वितीय योद्धा होते ज्यांच्या नावावर हा पराक्रम नोंदवला गेला. राजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा धडा शिकवला की त्यांची मराठा साम्राज्याविरोधात औरंगजेबला मदत करायची हिंमत झाली नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली. शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य वाढेल आणि मराठा साम्राज्य मातीस मिळेल अशी आशा बाळगून बसलेल्या औरंगजेबाला त्यानंतरही विजय न मिळाल्याने तो चवताळला होता.

शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराज यांनी आपल्याकडे घेतली. १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजीराजांचा रायगड किल्यावर राज्याभिषेक झाला. संभाजी राजांना विरोध असणारे आपकपटी हे घरातलेच होते. त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध असणार्‍या अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना संभाजी महाराज यांनी उदात्त अंतःकरणाने माफ केले होते आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले होते. मात्र, अखेरपर्यंत त्यांनी आपली वाकडी शेप सरळ केली नाही.

- Advertisement -

औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूर येथे हलवला. औरंगजेबाला तुळापूरच्या संगमावर संभाजी महाराज यांना हलाल करावयाचे होते. आपली एकनिष्ठा न सोडणार्‍या संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले. रांजणातून तप्त लालजर्द सळया शंभू राजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली. सारी छावणी थरारली पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. कवि कलश यांचेही डोळे काढण्यात आले. एवढे करूनही संभाजी महाराज डगमगले नाहीत. पशू बनलेल्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना पुढील शिक्षा जीभ कापायची दिली. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उघडेना. शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले तोच त्यांच्या तोंडात पकड घुसवली गेली. त्या पकडीत पकडलेली त्यंची जीभ तलवारीने कापण्यात आली.. त्यांच्यावर चाललेले हे अत्याचार पाहून भीमा-इंद्रायणीसुद्धा रडू लागली. अखेर संभाजी महाराज यांची ११ मार्च १६८९ रोजी भीमा – इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे हत्या करण्यात आली. स्वराज्याचा धनी अनंतात विलीन झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -