घरताज्या घडामोडीसेकंड हँड वाहन खरेदी महागली

सेकंड हँड वाहन खरेदी महागली

Subscribe

गेल्या काही वर्षांमध्ये नावारूपाला आलेला सेकंड हँड वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय दोन वर्षांपासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या मंदीच्या कचाट्यात सापडला आहे. सेकंड हँड वाहन घेण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली नसली तरी वाढलेल्या किमती आणि कोरोनामुळे विस्कळीत झालेले आर्थिक गणित यामुळे सणासुदीच्या काळात वाहन विक्री मंदगतीने सुरू असल्याने विक्रेते काहीसे नाराज आहेत. प्रत्येकाचे गाडी घेण्याचे स्वप्न असते. ज्यांना नवे कोरे वाहन घेणे परवडते त्यांचे ठीक असते, पण ज्यांचे बजेट कमी असते त्यांना जुने वाहन घेणे सोयीस्कर जाते. यामुळे गेल्या काही वर्षात जुन्या वाहन विक्रीचे प्रमाण वाढले आहे. वाहनांची काही ठिकाणी शोरूम देखील उघडण्यात आली आहेत. मात्र दोन वर्षांपासून हा व्यवसाय देखील मंदीच्या सावटाखाली असून, अद्याप तो सावरलेला नाही. याचा फटका आता जुन्या कार विक्रेत्यांना देखील बसू लागला आहे. शहर आणि परिसरामध्ये ३ ते ४ जण सेकंड हँड वाहन खरेदी- विक्रीचा व्यवसाय करतात.

या व्यावसायिकांकडून आठवड्याला एक ते दोन सेकंड हँड वाहने विकली जात होती. यामध्ये कारचे प्रमाण अधिक आहे. परंतु दोन वर्षांत या व्यवसायालाही फटका बसला. कोरोना महामारीला सुरवात झाली आणि सेकंड हँड वाहनांची विक्री घटली. सद्यःस्थितीमध्ये महिन्याला एखाद-दुसरे वाहन विकले जात असल्याचे दिसून येत आहे. आर्थिक व्यवस्थेचा फटका वाहन उत्पादकांना बसल्याने त्यांनी आपल्या वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत. यामुळे जुन्या वाहन खरेदीला ग्राहकांनी सुरवात केली आहे. नव्या वाहन खरेदीसाठी तात्काळ कर्ज आणि इतर सुविधा दिल्या जात असल्याने, जुने वाहन खरेदी करणारे ग्राहक नवीन खरेदीकडे वळले. याचा फटका सेकंड हँड कार खरेदी-विक्री व्यवसाय करणार्‍यांना बसला.
या व्यवसायामध्ये विक्रेते मालकाकडून थेट वाहन विकत घेतात आणि पुन्हा रंगरंगोटी करून विक्रीसाठी ठेवतात. तर दुसर्‍या पर्यायामध्ये वाहन मालक विक्रेत्यांच्या दुकानात आपले वाहन उभे करतो आणि वाहन विकून विक्रेत्याला कमिशन देतो. परंतु व्यवसायात नाव व्हावे यादृष्टीने पहिला पर्याय विक्रेते अधिक निवडत असतात. त्यामुळे सेकंड हँड वाहन विकले न गेल्यास विक्रेत्याने त्यावर कलेला खर्च वाया जाण्याची शक्यताही असते. शहर आणि परिसरातील वाहनांसाठी आवश्यक असणारी सर्व्हिस स्टेशन उपलब्ध नसल्याने ग्राहक सेकंड हँड कार खरेदीसाठी धजावत नाहीत.

- Advertisement -

जुन्या वाहनांबाबत नियम आणि धोरण सतत बदलत असल्याने त्याचा परिणामही विक्रीवर होताना दिसतो. शासनाने आता नव्याने बी. एस. ६ ही पर्यावरण तत्त्वप्रणाली आणल्याने जुने वाहन घेत असताना खरेदीदार धास्तावले आहेत. शिवाय इलेक्ट्रिक वाहनांचा देखील बोलबाला झाला असल्याने नेहमीची नव्या वाहनांची विक्री देखील मंदावली आहे.

आठवड्याला एक-दोन कार सहज विकल्या जात होत्या. परंतु आता महिन्यातून एखादी कार विकणे अवघड झाले आहे. यामुळे ना नफा ना तोटा यावर विक्रेत्यांना व्यवसाय करावा लागत आहे.
– इम्रान सय्यद, सय्यद मोटार, महाड

- Advertisement -

हे ही वाचा – Aryan Khan Bail Hearing: आर्यनची आजची रात्र तुरुंगात; जामीनावर उद्या सुनावणी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -