घरताज्या घडामोडीमहाड-पंढरपूर मार्गाच्या कामासह प्रवासही संथ गतीने

महाड-पंढरपूर मार्गाच्या कामासह प्रवासही संथ गतीने

Subscribe

वर्षभरापासून काम ठप्प, प्रवासी वैतागले

महाड शहराजवळून गेलेल्या म्हाप्रळ मार्गे पंढरपूर मार्गाच्या रूंदीकरण काम सुरू असून, गेलीे एक वर्ष हे काम ठप्प असल्याने महाड ते वराठी, म्हाप्रळपर्यंत खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. या भागातून ये-जा करीत असलेल्या अवजड वाहनांमुळे यात अधिकच भर पडली असून, या समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र दुर्लक्ष करीत आहेत.
हा राज्य मार्ग तालुक्यातील वराठीपासून सरू होऊन शिरगाव, पुढे खरवली, माझेरी करीत पुणे जिल्हा हद्दीत प्रवेश करतो. तालुका हद्दीतील रस्त्याची देखभाल-दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (महाड कार्यालय) ताब्यात होती, मात्र आता हा रस्ता महामार्ग बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. यामुळे हा मार्ग ९६५ डी. डी. या नवीन क्रमांकाने ओळखला जात आहे. हा मार्ग ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मगावी देखील या मार्गाने जाता येते. शिवाय या भागातील वारकर्‍यांचा पालखी मार्ग देखील आहे. आषाढी, कार्तिकीला या मार्गाने पालखी जात असते.

महामार्ग विभागाने या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली होती. मात्र कोरोना संक्रमण वाढल्याने काम बंद ठेवले गेले होते. त्यातच ज्या ठेकेदाराला काम देण्यात आले त्यानेच किल्ले रायगड मार्गाचे देखील काम घेतले होते. हे काम अर्धवट ठेवल्याने ठेकेदाराला दिलेले काम संपुष्टात आणले आणि महाड-म्हाप्रळ-पंढरपूर मार्गाचे काम देखील ठेकेदाराकडून काढून घेण्यात आले. त्यानंतर अन्य एका एजन्सीने ही काम घेतले. मात्र त्यांनी देखील प्रत्यक्ष सुरुवात केली नाही. मूळ ठेकेदार उप ठेकेदार नेमत असल्याने रस्त्यांची कामे रखडत चालली आहेत. या प्रक्रियेमुळे गेले अनेक महिने हे काम ठप्प आहे. यामुळे जागोजागी केलेले खोदकाम, मोर्‍यांची कामे वाहन चालविताना धोकादायक ठरत आहेत.
शिरगावपासून पुढे काही प्रमाणात रस्ता बर्‍या स्थितीत आहे. मात्र सव गावापासून पुढे कोणता खड्डा चुकवायचा, असा प्रश्न वाहन चालकाला पडतो. रत्नागिरी जिल्ह्याला हा रस्ता जोडला गेला असल्याने त्या जिल्ह्याच्या सीमेवरील गावांचा अधिक संबंध महाडला असल्या कारणाने बाजारपेठ आणि शिक्षण, आरोग्य आदी कारणास्तव या रस्त्यावर कायम वर्दळ असते. प्रवासी वाहतूक करणार्‍या खासगी वाहनांबरोबरच पुणे, रायगड, मुंबईकडे जाणार्‍या एसटीच्या गाड्या देखील या परिसरातून ये-जा करीत असतात. या मार्गावर तालुक्यातील गोमेंडी, वराठी, जुई, चिंभावे, तुडील, सव, रावढळ, म्हाप्रळ आदी गावे येतात. या परिसरातील नागरिकांचा थेट संबध हा महाड शहराशी येत असल्याने अव्याहत वाहनांची ये-जा मोठी असते.
त्यात या विभागात वामणे हे कोकण रेल्वेचे स्थानक आहे. रखडलेल्या कामामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाल्याचे राजेंद्र पाटणे यांनी सांगितले. या मार्गाच्या कामासाठी प्राधान्याने सुरुवात केली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.

- Advertisement -

महाडपासून म्हाप्रळपर्यंतचा प्रवास अत्यंत धोकादायक झाला आहे. जागोजागी खड्डे आणि केलेले खोदकाम यातून वाट काढताना कसरत करावी लागत आहे. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने सामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
– सुनील जाधव, सामाजिक कार्यकर्ता, गोठे

वार्ताहर :- निलेश पवार

- Advertisement -

हे ही वाचा :- Winter session 2021 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन लांबणीवर?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -