पावसाळ्यानंतर रायगडातील रस्ते होणार चकाचक ; २८ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर

खराब रस्त्यामुळे पर्यटकांमध्येही नाराजी

Roads in Raigad to be improved after monsoon; 28 crore 60 lakhs sanctioned
पावसाळ्यानंतर रायगडातील रस्ते होणार चकाचक ; २८ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण आणि मजबूतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी रायगड जिल्हा नियोजन समितीने २८ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १४ कोटी ७४ लाखांचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर हे काम सुरु होणार असून,यामुळे जिल्हा परिषदेचे १२० किलो मिटरचे रस्ते चकाचक होणार आहेत.
पर्यटनदृष्ट्या रायगड जिल्ह्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. ऐतिहासिक आणि औद्योगिक जिल्हा म्हणून देखील जिल्ह्याची ओळख आहे ; परंतु खराब रस्त्यामुळे पर्यटकही नाराजी व्यक्त करतात. त्याचा ग्रामीण भागातील रोजकारासह व्यवसायावर परिणाम होतो . यंदा चक्रीवादळासह अतिवृष्टीमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. निधींअभावी त्यांच्या दुरूस्तीची कामे रखडली होती. त्यामुळे रायगड जिल्हा नियोजन समितीकडे रस्त्यांचा कामांसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरणासाठी १२ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे . या निधीतून सुमारे ६० किलोमीटरचे रस्ते तयार होणार आहेत. या रस्त्याच्या कामासाठी ५० टक्के म्हणजे सहा कोटी ५३ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच इतर जिल्हा मार्ग ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण करण्यासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याद्वारे ८० किलो मीटरचे रस्ते चकाचक होणार असून, यासाठी आठ कोटी २१ लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

 १३६ नवीन साकव होणार

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांना जोडण्याऱ्या साकवांची अवस्था दयनीय झाली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून १३६ साकव बांधण्यासाठी १२  कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी सात कोटी ८० लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. अलिबागमधील २६,पेण १५ , पनवेल १४ ,पोलादपूर  ३ , म्हसळा ६ , महाड ५ , माणगाव ४ , मुरुड ४ , रोहा १२ ,सुधागड ४ , खालापूर ९ , कर्जत ११ ,उरण ११ , तळा २ , श्रीवर्धन ३ साकव उभारले जाणार आहेत.
“जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषद अखत्यारीत येण्यारा रस्ते व सकवांच्या बांधकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी ५० टक्के निधी वर्ग केला आहे. पावसाळा संपल्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवून रस्ते व सकवांच्या कामांना सुरुवात केली जाणार आहे. ३१ मार्च अखेर पर्यंत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.”
– के.वाय . बारदेस्कर, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद
◆ ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी २८ कोटी ६० लाख रुपयांचा निधीची तरतुद
◆ जिल्हा नियोजन समितीकडून निधी मंजूर
◆ १४ कोटी ७४ लाख रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडे वर्ग
◆ निधीमुळे १२० किलो मिटरचे रस्त्यांचे डांबरीकरण 
◆ १३६ साकव बांधण्यासाठी १२ कोटी८७ लाख रुपयांचा निधी मंजूर
◆ सकवांसाठी सात कोटी ३० लाख रुपयांचा निधी वर्ग
                                                                                          वार्ताहर – रत्नाकर पाटील

हे ही वाचा – नाराज वरुण गांधी काँग्रेसमध्ये जाणार? त्या पोस्टरवरुन चर्चांना उधाण