ठाण्यात आदित्य ठाकरेंना जोर का झटका, शेकडो युवासैनिक शिंदेगटात

एकेकाळचे एकनिष्ठ शिवसैनिक , नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिंदेगटात सामील होत असतानाच आता ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी शेकडो युवासैनिकांनी शिंदेगटात प्रवेश केला

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेला भलेमोठे खिंडार पडले असून शिंदेगटाने भाजपबरोबर सत्तास्थापन केली आहे. एकेकाळचे एकनिष्ठ शिवसैनिक , नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिंदेगटात सामील होत असतानाच आता ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी शेकडो युवासैनिकांनी शिंदेगटात प्रवेश केला. यामुळे आदित्य ठाकरे यांनाही झटका बसला आहे. विशेष म्हणजे आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक हे या युवासैनिकांचे नेतृत्व करत आहेत.

तर दुसरीकडे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिंदेगटाने तरुणाईला आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. युवा सेनेचे सचिव ,माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांच्यावर तरुणाईला शिंदेगटात सामील करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार रविवारी ठाण्यातील युवासेनेतील शेकडो तरुण तरुणींनी मुख्यमंत्री निवासस्थानी शिंदेगटात प्रवेश केला. यामुळे शिवसेनेची ठाण्यावरील पकड अधिकच सैल झाल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांना ठाण्यासह कल्ायण डोंबिवली अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगरमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दिलाच आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यातील ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर भाजपबरोबर शिंदेगटाने सरकार स्थापन केले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कारभार पाहात आहेत. हे सगळीकडे एकीकडे सुरू असताना दुसरीकडे मात्र शिंदेगटाकडून शिवसेनेची फोडाफोड सुरूच आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेच्या अनेक नगरसेवक, पदाधिकारी कार्यकर्ते्यांनी शिंदेगटाची वाट धरली आहे. यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश असल्याने शिवसेना लयास जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उ्द्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी पुन्हा नव्याने पक्षबांधणीसाठी कंबर कसली असून राज्यांचे दौरे सुरू केले आहेत. माजी नगरसेवकांची मनधरणी केली जात आहे. तर आदित्य यांच्याकडे तरुणाईची मोट बांधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.