नाशिक-पुणे रेल्वेमार्ग : १५ ऑक्टोबरपर्यंत जमिनी न दिल्यास ‘महारेल’ करणार सक्तीने भूसंपादन

नाशिक : नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी जमीनींचे दरही जाहीर करण्यात आले. मात्र अद्यापर्यंत जिल्हयात अवघ्या १५ हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात आले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करावयाची असून १५ ऑक्टोबरपर्यंत शेतकर्‍यांनी प्रतिसाद न दिल्यास सक्तीने भूसंपादन करण्याची भूमिका महारेलने स्पष्ट केली आहे.

जिल्ह्यात सिन्नर आणि नाशिक तालुक्यातील २२ गावांमधील २८५ हेक्टर क्षेत्र या प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात येणार आहे. सिन्नर तालुक्यातील आठ गावांमधील जमिनींसाठीचे दर जिल्हा प्रशासनाने घोषित केले आहेत. थेट वाटाघाटींद्वारे या जमिनी खरेदी करताना बाजारमूल्याच्या पाच पट मोबदला देण्यात येणार आहे. जमिनींच्या अधिग्रहणासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला असला तरी अवघ्या १५ हेक्टर क्षेत्रावरील खरेदीखतांची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली आहे. या प्रकल्पासाठी जमीन देण्यास शेतकर्‍यांनी सहमती न दर्शविल्यास सक्तीने भूसंपादनाची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. तसे पत्रही ‘महारेल’च्या जिल्ह्यातील अधिकार्‍यांना पाठविण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दिलेल्या मुदतीत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण व्हावी, यासाठी पावसाळ्यानंतर सक्तीने भूसंपादनाचे पाऊल प्रशासनाकडून उचलले जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.