राजस्थानमधील सरकार पाडण्याच्या कटात सचिन पायलटही होते सहभागी, मुख्यमंत्र्यांचा निशाणा

अशोक गेहलोत यांनी थेट सचिन पायलट यांचं नाव घेतल्याने राजस्थानमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

ashok gehlot and sachin pilot

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ सुरू असताना आता राजस्थानमधील राजकारणातही कुरबुरी सुरू असल्याचं समोर आलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली. सरकार पाडण्याच्या कटात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासोबतच सचिन पायलट यांचाही समावेश होता, असा घणाघात अशोक गेहलोत यांनी केला आहे. अशोक गेहलोत यांनी थेट सचिन पायलट यांचं नाव घेतल्याने राजस्थानमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. (Union Minister Gajendra Shekhawat And Sachin Pilot Cm Gehlot Said Both Names In Government Topple)

हेही वाचा आमची कमिटमेंट उद्धव ठाकरेंसोबत शरद पवारांचा पुनरुच्चार

हॉर्स ट्रेडिंगच्या मुद्द्यावरून गेहलोत यांनी दिलेल्या वक्तव्यावरून राजस्थानमध्ये पायलट आणि गेहलोत यांच्यातील वाद पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. शनिवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, सिंग आणि सचिन पायलट सरकार पाडण्याच्या कटात सामील होते. घोडे-व्यापारप्रकरणी केंद्रीय मंत्री शेखावत यांना नोटीस मिळाल्याच्या मुद्द्यावर ते बोलत होते, मात्र यावेळी केंद्रीय मंत्री शेखावत यांच्यासह गेहलोत यांनी पायलटवरही निशाणा साधला.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात आधीचपासूनच घमासान सुरू होते. मात्र, एकमेकांचं नाव घेऊन त्यांनी कधी टीका केली नव्हती. मात्र, आता २०२३ च्या विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या दीड वर्षाआधीच थेट आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने राजकीय वातावरणात चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा – गुजरात दंगलीला नेहमीच राजकीय नजरेतून पाहिले गेले, मी मोदींचे दु:ख जवळून पाहिले – अमित शाह

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला राहुल गांधींनी यापूर्वी केलेल्या वक्तव्याशी जोडूनही पाहिले जात आहे. दिल्लीत काँग्रेसजनांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले होते की, सचिन पायलट आणि माझ्यात चांगले व्यावसायिक संबंध आहेत. राहुल गांधींचे हे वक्तव्य मोठे राजकीय संकेत मानले जात होते. तसेच, जुलै महिन्यात राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता सचिन पायलटचे निकटवर्तीय आणि त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. पायलट समर्थक कॅमेऱ्यावर बोलणे टाळत असले तरी मुख्यमंत्र्यांनी पायलट समर्थकांना चिथावणी देण्यासाठी हे वक्तव्य केल्याचे बोलले जात आहे.

राजकीय तज्ज्ञांनुसार, मुख्यमंत्री गेहलोत हे राजकारणातील जाणकार खेळाडू आहेत. कधी काय, किती शब्दात बोलावे हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे सचिन पायलट यांच्याबाबत केलेले त्यांचे विधान सत्य आहे का याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.