घरताज्या घडामोडीजंजिरा किल्ल्यासाठी जल वाहतूक सुरू ; बोटींना मात्र पर्यटकांची प्रतीक्षा...

जंजिरा किल्ल्यासाठी जल वाहतूक सुरू ; बोटींना मात्र पर्यटकांची प्रतीक्षा…

Subscribe

कोविडच्या प्रार्दुभावामुळे किल्ल्याकडे जाणारी-येणारी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली

जंजिरा किल्ल्याकडे जा-ये करणारी प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली खरी,मात्र पर्यटकांची वर्दळ रोडावलेली असल्याने एरव्ही खचाखच भरणार्‍या बोटी रिकाम्या जात-येत आहेत. मुरुड येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला दरवर्षी १ सप्टेंबरपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येतो. मात्र कोविडचा प्रार्दुभाव वाढल्याने महाराष्ट्रात मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागू केल्यामुळे किल्ल्याकडे जाणारी-येणारी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु रविवार, १० ऑक्टोबरपासून किल्ल्याचे दार उघडल्यान जल वाहतूकही सुरू करण्यात आली आहे.

किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याने पर्यटक किल्ल्यात जाऊ लागले आहेत. पण सध्या त्यांची संख्या कमी असल्याने बोटी रिकाम्याच जात-येत आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी देताच पर्यटकांना किल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून पुरातत्त्व खात्याने दोन ते तीन दिवस साफसफाई मोहीम राबवून आतील भाग चकाचक केला. जंजिरा किल्ल्याच्या आतील परिसर हा २२ एकर जमिनीने व्यापलेला असून, पावसाळी हंगामात किल्ल्याच्या आतील भागात मोठे गवत आणि झाडे झुडपे वाढतात.

- Advertisement -

गेल्या अनेक महिन्यांपासून किल्ला बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांना राजपुरी आणि खोरा बंदरातून लांबूनच त्याचे दर्शन घ्यावे लागत होते. येथील जलवाहतूक सोसायट्यांनी किल्ला लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. पहिल्याच दिवशी आलेल्या पर्यटकांची संख्या तुरळक होती. त्यामुळे बोट व्यावसायिकांचा धंदा फारसा झाला नव्हता. आगामी सुट्टीच्या काळात हळूहळू पर्यटकांची गर्दी वाढेल, असा विश्वास बोट व्यावसायिकांसह छोटे-मोठे उद्योजक व्यक्त करीत आहेत.

हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायसुद्धा अडचणीत

दरवर्षी किल्ला पहाण्यासाठी पाच लाखावर पर्यटक येत असतात. परंतु तो बंद असल्याने पर्यटक येथे येऊन वस्ती करीत नव्हते. त्यामुळे हॉटेल आणि लॉजिंग व्यवसायसुद्धा अडचणीत आले होते. किल्ला पर्यटकांचे मोठे आकर्षण असल्याने तो पाहण्यासाठी जाणार्‍या पर्यटकांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी जंजिरा पर्यटक सोसायटीला महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाकडून परवाना देण्यात आला आहे. या संस्थेच्या १३ शिडांच्या बोटी आहेत. खोरा बंदरातूनही लाँचद्वारे पर्यटकांची ने-आण केली जाते. नजिकच्याच दिघी बंदरातूनही अशी व्यवस्था आहे.

- Advertisement -

 

                                                                                             वार्ताहर – उदय खोत


हे ही वाचा – Cruise Drug Case: आर्यन खानला आजही दिलासा नाही! २० ऑक्टोबरपर्यंत आर्यनचा आर्थररोड जेलमध्ये मुक्काम


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -