Union Budget 2023 : बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी करण्यात आल्या ‘या’ महत्त्वपूर्ण घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये सात महत्वाच्या गोष्टींना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील महत्वपूर्ण अशा घोषणा करण्यात आल्या आहेत

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडून आज संसदेत अर्थसंकल्प (बजेट 2023) सादर करण्यात आला. मोदी सरकारचा हा नववा अर्थसंकल्प असून लोकसभेच्या निवडणुकांना डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण अशा घोषणा करण्यात आलेल्या आहेत. तरुण उद्योजकांना अग्रस्थानी ठेवून कृषी-स्टार्टअपला प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात येणार आहे. कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या निधीची घोषणा करण्यात आली आहे. सदर निधी हा आधुनिक तंत्रज्ञानासाठी वापरला जाणार आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी 10 हजार बायो इनपुट रिसोर्स सेंटरची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पुढील तीन वर्षांमध्ये सरकारकडून एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठीचे प्रशिक्षण देखील देण्यात येणार आहे.

भारतात बाजरीचे उत्पादन मुबलक प्रमाणात होत असल्याने भारत हा बाजरीचे जागतिक केंद्र बनविण्यासाठी भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तृणधान्यासाठीदेखील ग्लोबल हब तयार करण्यात येणार आहे. भारतीयांच्या आहारात जे पारंपरिक पदार्थ असतात त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिवळून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच हॉर्टिकल्चरसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 2200 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. कापसासाठीदेखील क्लस्टर आधारित मूल्य साखळी योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे.

2023 च्या आर्थिक वर्षामध्ये कृषी कर्जाचे लक्ष्य हे 11.1 ने वाढवून 20 लाख कोटी रुपये करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे बचत गटांच्या सक्षमीकरणावर देखील सरकारकडून भर देण्यात येणार आहे. मत्स्यपालन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय या क्षेत्राला कर्ज देण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती या अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. तर मत्स्यपालन व्यवसायासाठी 60 हजार कोटी रुपये नवीन सवलतीची घोषणा करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेजची क्षमताही वाढवण्यात येणार असल्याची माहिती अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे.