भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी, चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

MADHURI MISAL

पुणे – भाजप आमदार माधुरी मिसाळ आणि त्यांचे दीर माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांना खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी इम्रान समीर शेखच्या (रा. विकासनगर, घोरपडी गाव) विरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पूर्वीही आमदार मिसाळांची आर्थिक फसवणूक झाली होती.

माधुरी मिसाळ यांनी जनसंपर्कासाठी दिलेल्या मोबाइलवर आरोपीने खंडणीसाठी मेसेज पाठवले आहेत.या नंबरवर आरोपीने ‘गुगल पे’द्वारे वारंवार 2 ते 5 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याचीही धमकी त्याने दिली. हा प्रकार १८ ते २३ सप्टेंबर या दरम्यान घडला. या बाबत पोलिस ठाण्यात दीपक मिसाळ (वय ५६, रा. फेअर रस्ता, गोळीबार मैदार, कॅम्प) यांनी तंक्रार दिली आहे.

दरम्यान शेख दररोज मेसेज करून आमदार मिसाळ यांना त्रास देत होता. त्याने दीपक मिसाळ यांनाही मेसेज करून 2ते 5 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास दीपक मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तंक्रारीत म्हटले आहे. शेख याच्याविरुद्ध अशाप्रकारचे काही गुन्हे चंदननगर पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यापूर्वीही फसवणूक –

आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे पैशाची मागणी करून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार यापूर्वीही घडला होता. आईच्या उपचारांसाठी महिला आमदारांना फोन करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.