West Bengal: TMCच्या महिला नेत्याच्या पतीवर झाडली गोळी; तर महिला नगरसेविकेच्या अंगावर घातली गाडी

2 TMC leaders attacked in two separate incidents in Bengal day after Birbhum arson
West Bengal: TMCच्या महिला नेत्याच्या पतीवर झाडली गोळी; तर महिला नगरसेविकेच्या अंगावर घातली गाडी

पश्चिम बंगालमध्ये हिंसा थांबण्यास नाव घेत नाहीये. तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची हत्या झाल्यापासून बीरभूमध्ये गेले दोन दिवस हिंसाचार उफाळला आहे. यादरम्यान नादियामध्ये तृणमूल काँग्रेसच्या महिला नेत्याच्या पतीवर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. एवढेच नाही तर हुगलीच्या तारकेश्वरमध्ये तृणमूलच्या महिला नगसेविकेला गाडीने उडवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये महिला नगरसेविका रुपा सरकार गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बीरभूम दौरा करणार असून दिल्लीत टीएमसीचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत.

गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये नगरपालिकेच्या संस्थांमध्ये निवडणुकाच्या झाल्या होत्या. त्यानंतरपासून पश्चिम बंगालमध्ये सतत राजकीय हिंसाच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. यापूर्वी सोमवारी बीरभूमच्या रामपुरहाटमध्ये टीएमसीच्या नेत्याची हत्या केली होती. टीएमसचे पंचायत नेते भादू शेख यांच्यावर बॉम्ब फेकला होता.

रामपुरहाटमध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर हिंसा चांगलीच भडकली होती. नेत्याच्या हत्येमुळे संतप्त असलेल्या टीएमसीच्या समर्थकांनी घटनेच्या काही तासानंतर संशयितांच्या १० ते १२ घराला आग लावली. यामध्ये १० जणांचा जळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान भाजपने या हिंसेला टीएमसी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘बीरभूमीमध्ये झालेली हिंसेची घटना दुर्दैवी आहे. परंतु अशा प्रकारच्या घटना इतर राज्यांमध्ये होत असतात.’


हेही वाचा – Birbhum Violence: मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आज बीरभूम दौरा, दिल्लीत TMCचं शिष्टमंडळ घेणार गृहमंत्र्यांची भेट