‘बालाकोट मध्ये २५० ठार’

अमित शहा यांचा नवा दावा

पाकिस्तानातील बालाकोटवरील एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले, याचा हिशोब विरोधी पक्ष मोदी सरकारकडे मागत आहेत. भारत सरकार, हवाई दलाने ठार झालेल्या दहशतवाद्यांचा नेमका आकडा अद्याप सांगितलेला नाही. मात्र भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी याबाबत भाष्य केले आहे. बालाकोटच्या एअर स्ट्राईकमध्ये २५० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले, असा दावा शहा यांनी गुजरातच्या सभेत केला.

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आमच्या फौजा पाकिस्तानात घुसल्या. त्यांनी तेथे सर्जिकल स्ट्राईक केला. आपल्या जवानांच्या हौतात्म्याचा आपल्या लष्कराने बदला घेतला. पुलवामानंतर प्रत्येकाने असा विचार केला की, यानंतर सर्जिकल स्ट्राईक होणार नाही. पण काय झाले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने पुलवामा हल्ल्यानंतर १३ व्या दिवशी एअर स्ट्राईक केला. त्यात २५० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले, असे अमित शहा म्हणाले.