Kedarnath Yatra 2022: मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित, भारतीय हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस (Heavy rains in Uttarakhand) सुरू असल्यामुळे केदारनाथ यात्रा (Kedarnath Yatra) स्थगित करण्यात आली आहे. या परिसरात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून भाविकांना हॉटेलमध्ये परतण्याचे आवाहन करण्यात येत आहे, अशी माहिती रुद्रप्रयागचे सीओ प्रमोद कुमार (Pramod Kumar) यांनी दिली आहे.

मंगळवारी या परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे गुप्तकाशीमध्ये सुमारे पाच हजार लोकांना थांबवण्यात आले असून त्यांना पुढे जाऊ दिले जात नाहीये. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर सेवाही बंद करण्यात आली आहे. तसेच केदारनाथ धामच्या आजूबाजूच्या डोंगरांवर बर्फवृष्टी झाली असून संपूर्ण परिसरात थंड वातावरण निर्माण झालं आहे.

पुढील ६ महिन्यांसाठी ही यात्रा सुरू राहणार

रविवारी संध्याकाळी सुरू झालेल्या हिमवृष्टीनंतर या भागात थंडी वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. केदारनाथ मंदिराच्या आजूबाजूच्या टेकड्या बर्फाने झाकल्या गेल्या आहेत. कडाक्याची थंडी असूनही भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षानंतर चार धामांपैकी केदारनाथ धामचे दरवाजे ६ मे रोजी उघडण्यात आले आहे. पुढील ६ महिन्यांसाठी ही यात्रा सुरू राहणार आहे.

केदारनाथमध्ये ३२०० यात्रेकरू थांबले

पावसामुळे केदारनाथमध्ये ३२०० यात्रेकरू थांबले आहेत. खराब हवामानामुळे केदारनाथच्या खालीही एकाही प्रवाशाला जाण्याची परवानगी नव्हती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सोनप्रयाग ते केदारनाथपर्यंत सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. याठिकाणी पोलीस उपअधीक्षक प्रबोध कुमार घिलडियाल यांनी सांगितले की, पावसामुळे सुरक्षिततेचा विचार करून प्रवास थांबवण्यात आला. हवामान खात्याचा इशारा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येत आहे.

हेलिकॉप्टरने केले ४० मिनिटं उड्डाण

खराब हवामानामुळे सोमवारी केदारनाथला जाणारी हेलिकॉप्टर सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. गुप्तकाशी, मैखंडा आणि इतर हेलिपॅडवरून सकाळी ७ ते ७.३५ या वेळेत केदारनाथसाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केले, मात्र त्यानंतर पाऊस आणि धुक्यामुळे दुपारपासून हेलिसेवा बंद होती.


हेही वाचा : PM Narendra Modi In Tokyo : मला लोण्यावर नाही दगडावर रेष ओढायला आवडतं, मोदींनी टोकियोत मांडली भूमिका