घरताज्या घडामोडीCorona Update : आन्ध्र प्रदेश सरकारची गरीबांना रेशन, १ हजार रुपयांची मदत

Corona Update : आन्ध्र प्रदेश सरकारची गरीबांना रेशन, १ हजार रुपयांची मदत

Subscribe

देशभरात करोना व्हायरसचा फैलाव वाढू लागलेला असताना अनेक राज्यांनी पूर्णपणे लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, झारखंड, आन्ध्रप्रदेश अशा राज्यांचा समावेश आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सर्वाधित ७५ रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. आन्ध्र प्रदेशमध्ये आत्तापर्यंत ६ करोनाग्रस्त रुग्ण आढळले असून त्या पार्श्वभूमीवर आन्ध्र प्रदेश सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानंतर ज्या लोकांचं हातावर पोट असतं, अशा लोकांची उपासमार होऊ नये, म्हणून अशा गरिबांसाठी मोफत रेशन आणि प्रति कुटुंब १ हजार रुपये इतकी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आन्ध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे.

गरज असेल, तरच बाहेर पडण्याचं आवाहन

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. ‘आजपासून येत्या ३१ मार्चपर्यंत आन्ध्र प्रदेशमध्ये पूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात येत असून लोकांनी फार गरज असेल, तरच घराबाहेर पडावे. राज्यांतर्गत आणि राज्याबाहेरची बस वाहतूक देखील यादरम्यान बंद असणार असून राज्य सरकारचे कर्मचारी आवश्यक तितक्याच प्रमाणात आळीपाळीने कामावर येतील’, असं यावेळी जगनमोहन रेड्डी यांनी जाहीर केलं.

- Advertisement -

आन्ध्र प्रदेशमध्ये परिस्थिती अजून तरी बरी!

दरम्यान, आन्ध्र प्रदेशमध्ये सापडलेल्या करोनाग्रस्त रुग्णांची माहिती देताना जगनमोहन रेड्डी म्हणाले, ‘इतर राज्यांच्या तुलनेत आन्ध्र प्रदेशामध्ये परिस्थिती काहीशी ठीक आहे. इथे आत्तापर्यंत ६ करोनाग्रस्त रुग्ण आढळले असून त्यापैकी एक रुग्ण बरा झालेला असून त्याला घरी सोडण्यात आले आहे.’

महाराष्ट्रात जमावबंदी

दरम्यान, महाराष्ट्रात रविवारी मध्यरात्री १२ वाजेपासून कलम १४४ अनुसारर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातली बस सुविधा, मुंबईतली लोकल व्यवस्था आणि राज्यभरातल्या ट्रेन सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याशिवाय, फक्त अन्नधान्य, मेडिकल आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.


हेही वाचा – दिलासादायक! पुण्यात ५४८ रूग्णांना घरी सोडले!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -