अमित शहांच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक, त्रिपुरा दौऱ्यात अनोळखी कारने केले ओव्हरटेक

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amti shah) बुधवारी त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे माणिक साहा यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्रिपुराच्या राजघराण्याचे माजी सदस्य प्रद्योत माणिक्य देबबर्मा यांची भेट घेतली आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि टिपरा मोथा यांच्यातील युतीबाबत चर्चा केली. पण त्यांच्या या भेटीदरम्यान पुन्हा एकदा त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक घडली.

कॅमेऱ्यात दिसत असलेल्या सुरक्षेच्या चुकीनुसार अमित शाह (Amti shah) यांचा ताफा आगरतळा येथील सरकारी अतिथीगृहातून बाहेर पडला तेव्हा पांढऱ्या रंगाची टाटा टिगोर गाडी त्यांच्या मागे आली. पोलिसांनी या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु टाटा टिगोरने त्यांना चकवा दिला आणि भरधाव वेगाने ताफ्याला मागे टाकले. अमित शहांच्या ताफ्याची शेवटची गाडी गेल्यावर ही गाडी ताफ्यात सामील झाली, तर इतर काही व्हीआयपी गाड्या त्यांच्या मागे जाणार होत्या. या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा – गुजरातेत अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या बापाने पोटच्या मुला-मुलीचा घेतला बळी

मुंबईतही सुरक्षेत चूक
गेल्या वर्षी, मुंबई पोलिसांनी एका ३२ वर्षीय व्यक्तीला एका कार्यक्रमादरम्यान अमित शाह यांना आंध्र प्रदेशच्या खासदाराचा खाजगी सचिव म्हणून भेटण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक केली होती. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हीच व्यक्ती यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर गृह मंत्रालयाचे सदस्य म्हणून उभे असताना आणि रिबन टॅग घेऊन दिसली होती.

पुण्यातही तरुणास अटक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळचा असल्याचे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या ताफ्यात शिरलेल्या एका व्यक्तीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे या व्यक्तीला ‘आयबी’च्या टीमने हेरले आणि काही मिनिटांतच ताब्यात घेतले. सोमेश धुमाळ असे या संशयिताचे नाव आहे.

हेही वाचा – 50 वर्षांनंतर ‘हा’ स्वदेशी ब्रँड पुन्हा बाजारात, रिलायन्स ग्रुपने केला लॉन्च