आम्ही भगतसिंग यांची मुले, तुम्ही सावरकरांची…, केजरीवालांची नायब राज्यपालांवर टीका

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर भ्रष्टाचार आणि दारू माफियांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे. तसेच दिल्ली सरकारच्या वादग्रस्त नवीन उत्पादन शुल्क धोरणाबाबत सीबीआय चौकशी करण्याची शिफारसही नायब राज्यपाल सक्सेना यांनी केली आहे. त्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे संतप्त झाले आहेत. आम्ही भगत सिंग यांची मुले आहोत, तुम्ही सावरकरांची मुले आहात, अशी टीका त्यांनी दिली.

मनीष सिसोदिया यांच्यावर केलेले आरोप खोटे असून ते इमानदार व्यक्ती आहेत. मी त्यांना गेल्या २२ वर्षांपासून ओळखतो मनीष सिसोदिया यांनी दिल्लीची शिक्षण व्यवस्था सुधारवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. दिल्ली सरकारची चांगली कामे होत असून ती थांबवण्यासाठीच सिसोदिया यांना जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी ऑनलाइन घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यातच आम आदमी पक्षाने पंजाब येथील विजयानंतर संपूर्ण देशात विजयी घोडदौड सुरू केली आहे. हे पहावल्या जात नसल्याने आमच्या पक्षावर चिखलफेक केली जात आहे, असे ते म्हणाले.

तुम्ही सावरकरांची मुले आहात. ज्यांनी ब्रिटिशांपुढे हात जोडत त्यांची माफी मागितली होती. आम्हाला जेलमध्ये जाण्याची भीती नाही. कारण आम्ही भगत सिंग यांची मुले आहोत. भगत सिंग आमचे आदर्श आहेत. ज्यांनी ब्रिटिशांपुढे वाकायला नकार दिला आणि ते फासावर गेले. आम्हाला तुरुंगवास किंवा फाशीचे भय वाटत नाही. आम्ही कितीतरी वेळा तुरुंगात जाऊन आलो आहे, असे केजरीवाल म्हणाले.

आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सत्येंद्र जैन यांना तुम्ही अटक केली आणि आता दिल्लीतील लाखो मुलांचे करिअर घडवणारे आणि आयुष्य घडवणाऱ्या सिसोदियांना तुरुंगात टाकायचं आहे, असे सांगून केजरीवाल म्हणाले, आता आपल्या देशात एक नवी सिस्टीम तयार करण्यात आली आहे. आधी कोणत्या व्यक्तीला तुरुंगात पाठवायचे, हे निश्चित केले जाते. मग त्याच्यावर एक काल्पनिक खोटी केस बनवली जाते आणि त्याला जबरदस्ती तुरुंगात डांबले जाते.

हेही वाचा – अनिल परब यांचा फोन तपासा…, ‘आपलं महानगर’च्या बातमीवर केसरकरांचे शिक्कामोर्तब