घरक्रीडाऑस्ट्रेलियात कोरोना काळात विमान प्रवास बंदी उल्लंघन करणाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा, हजारोंचा...

ऑस्ट्रेलियात कोरोना काळात विमान प्रवास बंदी उल्लंघन करणाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा, हजारोंचा दंड

Subscribe

एका रिपोर्टनुसार, भारतात सध्या ९ हजार ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर, ऑस्ट्रेलियाने हवाई वाहतूक स्थगित केली आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होणे हा चिंतेचा विषय असून ऑस्ट्रेलियामध्ये भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांना १५ मेपर्यंत प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी या आठवड्यात केली होती. त्यांच्या घोषणेनंतरही भारतात असणारे ऑस्ट्रेलियन नागरिक मायदेशी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. एका रिपोर्टनुसार, भारतात सध्या ९ हजार ऑस्ट्रेलियन नागरिक आहेत. परंतु, आता ऑस्ट्रेलियन सरकारने नियम कठोर केले असून आपल्याच नागरिकांना मायदेशी परतण्यास मनाई केली आहे. नियम मोडल्यास हजारोंचा दंड किंवा थेट ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे.

नियम मोडणाऱ्यांविरोधात गुन्हा

मागील १४ दिवसांपासून भारतात वास्तव्यास असलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना देशात परतण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडल्यास त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात येईल. ३ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, असे ऑस्ट्रेलियन सरकारमधील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ऑस्ट्रेलियामध्ये त्यांच्याच नागरिकांना देशात परतल्यास गुन्हा दाखल करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे काय?

ऑस्ट्रेलियन सरकारच्या या निर्णयामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या चिंतेत भर पडली आहे. ही स्पर्धा ३० मेपर्यंत चालणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारतातून येणाऱ्या प्रवासी विमानांना १५ मेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. परंतु, ही बंदी वाढल्यास ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी मायदेशी कसे परत जायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी स्वतःच सोय करावी लागणार असल्याचे पंतप्रधान मॉरिसन यांनी याआधीच स्पष्ट केले आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -