घरदेश-विदेशभारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये दहशत : जयराम रमेश

भारत जोडो यात्रेमुळे भाजपमध्ये दहशत : जयराम रमेश

Subscribe

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने देशभरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. याबाबत काँग्रेस पक्षाकडून देखील पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काँग्रेसने भाजपवर सडकून टीका केली.

मोदी आडनावावरून बदनामीकारक वक्तव्ये करणे हे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी त्यांना सुरत कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली असली तरी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजुर करण्यात आला आहे. पण लोकसभा सचिवालयाच्या या कारवाईनंतर काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसच्या बाजूने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी मत मांडले. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी भाजपवर सडकून टीका केली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, भारत जोडो यात्रेमुळे भाजप खूप घाबरली आहे, तो पक्ष खूप चिंतेत आहे हे स्पष्ट आहे. कारण त्यांना माहित झाले आहे की, भारत जोडो यात्रेमुळे फक्त काँग्रेस पक्षात नाही तर देशातील लोकांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. कित्येक महिने ते भारत जोडो यात्रेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याच भारत जोडो यात्रेची राहुल गांधी यांना किंमत मोजावी लागली असल्याचे यावेळी जयराम रमेश यांनी सांगितले.

- Advertisement -

पुढे बोलताना ते म्हणाले की, २०१४ पासूनच राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात संसदेच्या आत आणि संसदेच्या बाहेर निडरपणे बोलत होते. नोटबंदी असो, जीएसटी असो किंवा चीनला क्लीनचिट देणे असो, पण या सर्व मुद्द्यांव्यतिरिक्त आणखी एका कारणामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आणि ते म्हणजे गौतम अदानी यांचा महाघोटाळा. जेव्हा पासून राहुल गांधी यांनी संसदेत या मुद्द्यावरून ५० मिनिटे भाषण केले आणि ज्या पद्धतीने १६ विरोधी पक्षांनी एकत्र येत ५ फेब्रुवारीपासून या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केली. तसेच हा घोटाळा फक्त अदानी यांच्याशीच संबंधित नाहीये तर यात पंतप्रधानांचे धोरण देखील स्पष्ट होत आहे. पण आम्ही आता वारंवार ही चौकशीची मागणी करत राहू आणि याच अदानीच्या घोटाळ्यावरून लक्ष हटवण्यासाठी आज ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप जयराम रमेश यांच्याकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही राजकीय सुडाने करण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. तसेच कोणीही कितीही प्रयत्न केला तरी काँग्रेसचा आणि राहुल गांधी यांचा आवाज कोणीही दाबू शकणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसकडून घेण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल गांधींवरील कारवाई राजकीय सुडाने; काँग्रेसने स्पष्ट केली भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -