शशी थरूर यांच्या जाहिरनाम्यातील चुकीच्या नकाशावरून भाजपाचा हल्लाबोल

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तिघे जण रिंगणात उतरल्याने हे पद गांधी परिवाराव्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार आहे. त्यातील एक उमेदवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आहेत. त्यांनी आपल्या जाहिरनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्याने भाजपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसचे अध्यक्षपदाचे दावेदार शशी थरूर यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात भारताचा विकृतरित्या नकाशा दाखवला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असून, काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले मात्र भारताचे तुकडे करण्याच्या नादात आहेत. यामुळे गांधींची मर्जी राखता येईल, असे त्यांना बहुधा वाटत असावे, अशी टीका भाजपा नेते अमित मालवीय यांनी केली आहे.

त्याचबरोबर अमित मालवीय यांनी 21 डिसेंबर 2019चे शशी थरूर यांच्या ट्वीटचा संदर्भ देत, मालवीय यांनी शरसंधान केले आहे. शशी थरूर यांनी हे पहिल्यांदाच केलेले नाही. त्यांनी हा वारंवार असे कृत्य केले आहे. भारताचे तुकडे व्हावेत, अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यांनी एकापेक्षा जास्त वेळा त्यांनी हा मानस व्यक्त केला आहे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

तथापि, या नकाशाबद्दल शशी थरूर यांनी माफी मागितली असून ती चूक सुधारली आहे. कोणीही जाणूनबुजून अशा गोष्टी करत नाही. कार्यकर्त्यांच्या एका छोट्या टीमने ही चूक केली आहे. आम्ही ती त्वरित सुधारली आहे. यासाठी मी माफी मागतो, असे शशी थरूर यांनी म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या रिंगणात मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि के. एन. त्रिपाठी हे तिघे उतरले आहेत.