घरदेश-विदेशवादग्रस्त विधानावरुन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्याविरोधात तक्रार

वादग्रस्त विधानावरुन केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्याविरोधात तक्रार

Subscribe

पिकांना न मिळणारे हमीभाव, कर्जमाफी, दुधापासून न मिळणारा योग्य नफा या सगळ्या गोष्टींना वैतागून महाराष्ट्राबरोबरच देशभरातील अनेक राज्याच्या शेतकऱ्यांनी १ जूनपासून १० दिवसांचा संप पुकारला आहे. किसान लाँगमार्च असो किंवा एक वर्षाआधीचा शेतकरी संप, सरकार दिलेले आश्वासने पूर्ण करत नसल्यामुळे शेतकरी पुन्हा आंदोलन करत आहेत. परंतु, या संपाबद्दल केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी शनिवारी पटनातल्या एका पत्रकार परिषदेत वादग्रस्त विधान केल्याबद्दल त्यांच्यावर बिहारच्या एका शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तमन्ना हाशमी यांनी तक्रार दाखल केली आहे.

काय आहे वादग्रस्त विधान?

राधामोहन सिंह यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, “देशभरात एकूण बारा ते चौदा कोटी शेतकरी आहेत. त्यांच्या शेकडो वेगवेगळ्या संघटना असतील आणि त्या संघटनेत हजारो शेतकरी कार्यकर्ते असतील. मीडियामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी काहीतरी असामान्य काम करण्याची आवश्यकता असते. त्यासाठीच शेतकऱ्यांचे असे उपक्रम चालू असतात.” त्याचबरोबर एका पत्रकाराने शेतकऱ्यांची आत्महत्या आणि मध्य प्रदेशमध्ये चालणाऱ्या तीव्र आंदोलनाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही, असं नाही. मध्य प्रदेशमध्येही शेतकऱ्यांसाठी बरीच कामं केली आहेत. परंतु, मीडियामध्ये पब्लिसिटी मिळावी म्हणून काही शेतकरी असे वेगवेगळे उपक्रम करतात.”

- Advertisement -

बिहारच्या तमन्ना हाशमी यांची तक्रार

कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्या अशा वादग्रस्त विधानानंतर देशभरातून त्यांना विरोध करण्यात आला. बिहारच्या एका शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तमन्ना हशमी यांनी कृषीमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या राज्यांमध्ये शेतकऱ्यांचा १० दिवसांचा संप

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी १ जूनपासून दहा दिवसांचा संप पुकारला आहे.

- Advertisement -

नागपूरमध्येही कृषीमंत्र्यांच्या निषेधार्थ निदर्शनं

राधामोहन सिंह यांच्या वादग्रस्त विधानावर देशभरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या संतापातून जगभर निषेध करण्यात आले. नागपूरातही या बाबतीत निदर्शनं करण्यात आली. नागपुरात आज सकाळी संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकत कृषीमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने केली.

संपाचा परिणाम

चार दिवसांपासून सुरु असलेल्या या संपाचे परिणाम देशभरात जाणवताना दिसत आहेत. शेतकऱ्यांनी पालेभाज्या आणि दुधाचा पुरवठा बंद केल्यामुळे भाज्यांच्या किंमती वाढल्या आहेत. पंजाबच्या भठिंडा आणि मानसा जिल्ह्यांमध्ये सकाळी घरोघरी दूध पोहोचवणाऱ्या दुधवाल्यांना अडवून त्यांचे दूध रस्त्यावर फेकण्यात आले.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -