महागाई आणि बेकारीच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक; काळे कपडे परिधान करून खासदार संसदेत

नवी दिल्ली : महागाई आणि बेकारीच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसतर्फे आज सकाळपासून देशभर आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तर, काळे कपडे परिधान करून काँग्रेस खासदार संसदेत दाखल झाले आणि तिथे त्यांनी निदर्शने केली.

वाढत्या महागाई आणि बेकारीच्या विरोधात काँग्रेसतर्फे विविध राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. या दरम्यान पोलिसांनी काही नेत्यांना ताब्यातही घेतले आहे. त्याच अनुषंगाने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस खासदार काळे कपडे परिधान करून संसदेत दाखल झाले आहेत. संसंदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून संसद परिसरात काँग्रेस खासदारांनी निदर्शनेही केले. या आंदोलनात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्लीत मनाई आदेश असल्याचे सांगत काँग्रेसला आंदोलन करण्यास दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचे काँग्रेसने ठरवले आहे. काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांनी संसद भवनापासून राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च काढला होता.

लोकसभेत गदारोळ
महागाईबरोबरच इतर प्रश्नांवरून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या खासदारांनी लोकसभेत गदारोळ केला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे २५ मिनिटांचे कामकाज चालल्यानंतर दोन वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.