Corona Virus : दिल्लीत पुन्हा मास्क अनिवार्य, मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड

दिल्लीतील वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला DDMA ने सार्वजनिक ठिकाणी मास्कची आवश्यकता रद्द केली होती. मात्र, वाढत्या कोरोनावर आळा घालण्यासाठी आज एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आदेशानंतर मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

कोविड-१९ च्या प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाल्यामुळे सरकार लवकरच शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार असल्याचं केजरीवाल सरकारने सूचित केले होते. मात्र, दिल्लीतील काही शाळकरी मुलांना देखील कोविडची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु डीडीएमएने घेतलेल्या निर्णयानंतर दिल्लीतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

या राज्यांना कोरोनाबाबत केंद्राचं पत्र

महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि मिझोराम या राज्यांना कोरोनाबाबत केंद्राकडून पत्र देण्यात आलं आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने राज्यांना कोरोनाबाबतचं पत्र दिलं आहे.

केंद्राच्या पत्रावर आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

देशभरात कोरोना आटोक्यात आला आहे. मात्र काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय. याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेला घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं आहे. तसेच कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून लसीकरणही समाधानकारक असल्याचं टोपे म्हणाले.

देशात आतापर्यंत २ हजार ६७ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर मागील २४ तासांत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. काल मंगळवारी १ हजार २४७ कोरोनाचे रूग्ण आढळून आले होते. तर एकाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात १२७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. मंगळवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आतापर्यंत राज्यातील कोरोना बळींची संख्या ही १,४७,८३० इतकी झाली आहे.


हेही वाचा : 7th Pay Commission: केंद्राकडून कर्मचाऱ्यांना खुशखबर, कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ