हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली : ज्येष्ठ उद्योगपती आणि हिंदुजा बंधूंमधील ज्येष्ठ श्रीचंद परमानंद हिंदुजा (SP Hinduja) यांचे आज (17 मे) निधन झाले आहे. कुटुंबीयांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, श्रीचंद परमानंद हिंदुजा यांनी वयाच्या 87 व्या वर्षी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते, तर त्यांची पत्नी मधु हिंदुजा यांचे याचवर्षी फेब्रुवारीमध्ये निधन झाले आहे.

कौटुंबिक प्रवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज आमचे कुटुंबीय आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे निधन झाल्याची घोषणा करताना गोपीचंद, प्रकाश, अशोक आणि संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला अतिशय दुःख होत आहे. एसपी हिंदुजा यांना स्मृतिभ्रंश झाला होता. ते हिंदुजा कुटुंबाचे गुरू होते. एसपी हिंदुजा यांनी यजमान देश यूके आणि त्यांचा मूळ देश भारत यांच्यात मजबूत संबंध निर्माण करण्यात त्यांनी आपल्या भावांसोबत खूप महत्त्वाची भूमिका बजावली.

एसपी हिंदुजा यांचा पाकिस्तानमध्ये जन्म
हिंदुजा ग्रुपचे संस्थापक पीडी हिंदुजा यांचे श्रीचंद परमानंद ज्येष्ठ पुत्र. याशिवाय त्यांना जीपी हिंदुजा, प्रकाश हिंदुजा आणि अशोक हिंदुजा असे तीन भाऊ आहेत. श्रीचंद परमानंद यांना एसपी हिंदुजा म्हणूनही ओळखले जात होते. त्यांचा जन्म 1935 मध्ये कराची (पाकिस्तान) येथे झाला. 1952 मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते वयाच्या 18 व्या वर्षी वडिलांच्या व्यवसायात रुजू झाले. नंतर त्यांनी ब्रिटीश नागरिकत्व घेतले आणि लंडनमध्ये स्थायिक झाले. नुकतेच निधन झालेल्या मधु हिंदुजा यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना शानू आणि वीणू या दोन मुली आहेत.

हिंदुजा कुटुंबाकडे 14 अब्ज डॉलर्सची संपत्ती
हिंदुजा ग्रुप बँकिंग, केमिकल्स, पॉवर, मीडिया, हेल्थ आणि ट्रक व्यवसायात सक्रीय आहेत. या समूहातील कंपन्यांमध्ये ऑटो कंपनी अशोक लेलँड आणि इंडसइंड सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार हिंदुजा कुटुंबातील चार भावांची एकूण संपत्ती तब्बल $14 अब्ज एवढी आहे.

एसपी हिंदुजा यांचे बोफोर्स घोटाळ्यात नाव
एसपी हिंदुजा यांचे ऐंशीच्या दशकात बोफोर्स घोटाळ्यात नाव पुढे आले होते. हिंदुजा बंधूंना गांधी घराण्याशी असलेल्या जवळीकीचा मोठा फायदा बोफोर्स घोटाळ्यात झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. गांधी घराण्याशी जवळीकीमुळे बोफोर्स करार स्वीडिश कंपनीच्या नावे करून घेण्याचे कामही हिंदुजा बंधूंकडे देण्यात आले होते.