घरताज्या घडामोडीवर्क फ्रॉम होमला भारतीयांचा नकार; इंडीडचा सर्वे

वर्क फ्रॉम होमला भारतीयांचा नकार; इंडीडचा सर्वे

Subscribe

जगभर पसरणाऱ्या कोरोनाने गेल्यावर्षी अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होऊ नये, याकरता सर्व देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. या दरम्यान, बऱ्याच देशात कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडला होता. त्याप्रमाणे भारत देशात देखील वर्क फ्रॉम होम करण्यात आले. मात्र, अनलॉक प्रक्रियेनंतर अनेक ऑफिसेस पुन्हा एकदा सुरु करण्यात आली. त्यानुसार इंडीडने सर्वे करत भारतीयांना वर्क फ्रॉम होम हा पर्याय योग्य वाढतो की ऑफिसमध्ये जाणे योग्य वाटते. याबाबत विचारणा केली असता भारतीयांनी वर्क फ्रॉम होमला नकार देत. ऑफिसमध्ये जाऊन काम करणे योग्य वाटते, असे सांगितले.

उलट स्थलांतर हा काही काळासाठीचा ट्रेंड 

जागतिक महासंकटानंतर जगभरातील कंपन्यांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांना दूरस्थ कार्यपद्धती सुरू ठेवण्यात फारसा रस नाही. ५९ टक्के मालक न्यू नॉर्मल परिस्थितीत दूरस्थ कार्यपद्धतीच्या बाजूने नाहीत आणि १० पैकी ७ जणांनी सांगितले की, या संकटावरील उपाय सापडला की, ती ही पद्धत सुरू ठेवणार नाहीत. खरेतर दर ४ पैकी ३ मालकांनी दूरस्थ पद्धतीतही कर्मचाऱ्यांच्या उत्पादकतेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगितले आहे. जगभरातील कंपन्यांच्या तुलनेत (६० टक्के मोठ्या आणि ३४ टक्के मध्यम कंपन्या) ६७ टक्के मोठ्या आणि ७० टक्के मध्यम आकाराच्या भारतीय कंपन्या महासंकटानंतर दूरस्थ कार्यपद्धतीच्या विरोधात आहेत. तर डिजिटलस्नेही स्टार्टअप्सनीही या संकटानंतर कार्यालयात जाऊन काम करण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगितले. या संकटावर उपाय सापडला की, दूरस्थ कार्यपद्धती सुरू ठेवण्यात रस नसल्याचे यातील ९० टक्के सहभागींनी सांगितले.

- Advertisement -

४६ टक्के मालकांच्या मते उलट स्थलांतर तात्पुरते आहे आणि ५० टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ‘नोकरीत तशी गरज असल्यास त्यांना मूळ शहरातून पुन्हा महानगरांमध्ये जाण्याची इच्छा आहे. भविष्यात पुन्हा परतण्यामागे विविध कारणे आहेत. वर्क फ्रॉम होमचा पर्याय (२९ टक्के) आणि महासंकटाला आटोक्यात आणणे (२४ टक्के), तर फक्त ९ टक्के कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ते आता कायमस्वरुपी त्यांच्या मूळ गावीच राहतील. दर प्रत्येक दोनपैकी एका कर्मचाऱ्याने सांगितले की, नोकरीत गरज भासल्यास ते पुन्हा महानगरांमध्ये स्थलांतर करतील आणि ३२ टक्क्यांनी सांगितले की, ते मूळ शहरातच नोकरी शोधण्यास प्राधान्य देतील, अगदी त्यात पगार कमी मिळाला तरी. मूळ शहरातून काम करताना कमी पगार घेण्याची तयारी पदाप्रमाणे घटत जाते – वरिष्ठ पदावरील ८८ टक्के कर्मचाऱ्यांना कमी पगार चालणार आहे, तर ५० टक्के लोकांनी सांगितले की, नोकरीत आवश्यकता भासल्यास ते पुन्हा महानगरात जातील.

या निष्कर्षांबद्दल इंडीड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शशी कुमार म्हणाले, “इंडीडवरील जॉब पोस्टिंग्स म्हणजे भारतातील लेबर मार्केटमधील घडामोडींचा प्रत्यक्ष निदर्शक असतो. मार्च २०२१ मध्ये आमच्या निदर्शनास आलेली रंजक माहिती म्हणजे ‘रीमोट’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’ नोकऱ्यांचा शोध मागील वर्षीच्या याच काळाच्या तुलनेत ४३७ टक्क्यांनी वाढला. यातून वेगाने बदलणाऱ्या कामाच्या पद्धती दिसून येतात. दूरस्थ कार्यपद्धती ‘इक्वलायझर’ ठरली आहे. यामुळे कंपन्यांना त्यांच्या कार्यपद्धतींचा नव्याने विचार, नव्या स्वरुपात व्यवस्थापन करावे लागले, लवचिकता आणि उत्पादकतेच्या नव्या संकल्पना अंगिकारण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे लागले. अर्थात, जिथे सोयीपेक्षा संस्कृती महत्त्वाची आहे आणि लोक एकत्र आल्यास समस्या सोडवणे प्रचंड सोपे होते, अशा आपल्यासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेत आपण पुन्हा पूर्ववत होत असताना हे सगळे कसे पुढे जाते, हे पाहाणे औत्सुक्याचे असेल.”

- Advertisement -

महिलांना स्थलांतराची अधिक इच्छा 

पुरुष कर्मचाऱ्यांच्या (२९ टक्के) तुलनेत दुप्पट, म्हणजेच ६० टक्के महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांना पुन्हा मूळ गावी परतण्याची इच्छा आहे. सध्याच्या क्वारंटाइन पद्धतीच्या जीवनशैलीत कुटुंबाचे पुरेसे साह्य नसणे किंवा कामाचे तास वाढवून मालक कर्मचाऱ्यांवरील खर्च कमी करत असल्याचे प्रयत्न अशी कारणे त्यामागे आहेत. अर्थात, मूळ शहरातून काम करताना कमी पगार घेण्यास पुरुषांच्या (४२ टक्के) तुलनेत अधिक महिला (६० टक्के) राजी आहेत. मनुष्यबळ बाजारपेठेत असमानता अधिक वाढेल, अशी सध्याची स्थिती आहे. त्यात २९ टक्के पुरुषांच्या तुलनेत ५९ टक्के महिलांच्या मते त्यांच्या मूळ गावी नोकरी शोधणे काहीसे कठीण आहे. ६० टक्के महिलांच्या मते नोकरीत आवश्यकता भासल्यास त्या पुन्हा महानगरात जातील.

मिलेनियल्सच्या (३८ टक्के) तुलनेत बेबी बूमर्स (५६ टक्के) आपल्या मूळ गावी पुन्हा जाण्यास फारसे उत्सुक नाहीत. या जागतिक महासंकटाने मिलेनियल्सच्या तुलनेत बूमर्सच्या पिढीवर नोकरीतील पुढील शक्यतांच्या बाबतीत अधिक परिणाम केला आहे. मिलेनियल्सच्या (२५ टक्के) तुलनेत साधारण दुप्पट बूमर्सना (४४) त्यांच्या मूळ गावी नोकरी शोधणे कठीण वाटते. तसेच ६१ टक्के बूमर्स त्यांच्या मूळ गावी कमी पगार घेण्यासही तयार आहेत. मिलेनियल्स कर्मचारी अधिक चपळ सहकारी मानले जातात, स्थलांतरास अधिक इच्छुक असतात आणि बूमर्सच्या (२२ टक्के) तुलनेत मिलेनियल्स (४४ टक्के) म्हणतात की, नोकरीत आवश्यकता भासल्यास ते पुन्हा महानगरात जातील. दूरस्थ कार्यपद्धतीमुळे द्वितीय/तृतीय श्रेणी शहरांमध्ये विकासाला गती मिळेल, अशी आशा आहे

उलट स्थलांतराच्या ट्रेंडचा फायदा घेण्यासाठी ३० टक्के मालक कदाचित छोट्या शहरांमध्ये कामकाज सुरू करण्याचा विचार करतील. जागतिक आणि भारतीय असे दोन्हीकडील मोठे आणि मध्यम उद्योग द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांमध्ये नवी कार्यालये स्थापण्यास किंवा सध्याच्या कामाचा विस्तार करण्यास इच्छुक आहेत. हे प्रमाण ५० टक्के ते ८८ टक्के असे लक्षणीय आहे. त्याचप्रमाणे, ५० टक्के कर्मचाऱ्यांना आशा आहे की, नजीकच्या भविष्यकाळात (२१ टक्के) किंवा भविष्यात कधीतरी (२९ टक्के) उलट स्थलांतरामुळे त्यांची मूळ शहरे महानगरांमध्ये विकसित होतील. मालकांच्या मते महानगरांमध्ये भविष्यात व्यवसाय विकासासाठी इंटरनेट सेवा (३० टक्के), अॅप आधारित व्यवसाय (३० टक्के) आणि रीटेल, आरोग्यसेवा आणि मनोरंजन केंद्रे (२७) हे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत. मात्र, शाळा व कॉलेजांमधील वृद्धी फारशी दिसून आली नाही. मालकांना सध्या या शहरांमध्ये भासणारी प्रतिभेची वानवा यामुळे अधिकच वाढेल, अशी भीती यातून दिसून येते. अर्ध्याहून अधिक (५५ टक्के) मालकांनी नव्या महानगरांमध्ये प्रतिभेची वानवा असल्याचे सांगितले. यातून शैक्षणिक संस्था, अत्यावश्यक सेवा आणि डिलिव्हरी भागीदारांना वाढीची संधी आहे. पण, उलट स्थलांतर तात्पुरते आहे, असेही यातून दिसून येते.


हेही वाचा – TRP Scam: फक्त मराठी, बॉक्स सिनेमा, महा मूव्ही चॅनेल्सची ३२ कोटींची मालमत्ता जप्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -