घरट्रेंडिंगमोदींवर टीका करणाऱ्या पत्रकाराला पोलीस कोठडी

मोदींवर टीका करणाऱ्या पत्रकाराला पोलीस कोठडी

Subscribe

किशोरचंद्र वांगखेम असं या पत्रकाराचं नाव असून, मंगळवारी त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) एका वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याची शिक्षा सुनावली गेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर टीका केल्याप्रकरणी मणिपूरच्या एका पत्रकाराला थेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. किशोरचंद्र वांगखेम असं या पत्रकाराचं नाव असून, मंगळवारी त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) एका वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याची शिक्षा सुनावली गेली आहे. २१ नोव्हेंबर रोजी त्यांना सर्वप्रथम अटक करण्यात आली होती. त्यानंतर २५ नोव्हेंबरला पश्चिम इंफाळमधल्या कोर्टानं त्यांना ७० हजार रुपयांच्या दंडावर जामीन दिला होता. दरम्यान, वांगखेम यांना जामीन देतेवेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येणार नाही असं कोर्टाने जाहीर केलं होतं. मात्र, ‘रासुका’च्या सल्लागार मंडळानं वांगखेम यांना पुन्हा एका वर्षासाठी ताब्यात देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. सल्लागार मंडळाच्या म्हणण्यानुसार, ‘किशोरचंद्र वांगखेम यांचा इतिहास बघता, ते पुन्हा आक्षेपार्ह विधान करतील आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी त्यांचं विधान कारणीभूत ठरेल, आणि म्हणूनच रासुका कायद्याच्या १३व्या कलमाअंतर्गत त्यांना बारा महिन्यांच्या पोलीस कोठडीत ठेवणं योग्य ठरेल’.

 काय आहे ‘रासुका’ कायदा?

दरम्यान, भारतीय पत्रकार संघ आणि प्रेस काउंसिल ऑफ इंडियाने त्यांच्या अटकेप्रकरणी जाहीर निषेध नोंदवला आहे. तसंच किशोरचंद्रांच्या परिवारातीस सदस्यही त्यांच्या शिक्षेला आव्हान देण्याची शक्यता आहे. ‘रासुका’ अंतर्गत कोणालाही कमाल १२ महिन्यांपर्यंत ताब्यात ठेवता येतं. यापूर्वी अनेक सामाजिक संस्थांनी ‘रासुका’ हा कायदा अत्यंत मागास असून अन्यायकारक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, रासुकाच्या सल्लागार मंडळाचा निर्णय योग्य असल्याचं सांगत मणीपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनीही या निर्णयावर सही केली असून,  किशोरचंद्राच्या या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले आहे, असे वृत्त NDTV वृत्तवाहिनीने दिलं आहे.

- Advertisement -

किशोरचंद्र काय म्हणाले?

माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, किशोरचंद्र (वय ३९) यांनी फेसबुकवर एका व्हिडीओच्या माध्यमातून मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. हे राज्यसरकार झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी करत असल्याचं मला दुःख होतंय आणि मी तितकाच हैराण आहे, असं वक्तव्य त्यांनी या व्हिडीओमध्ये केलं होतं. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा मणिपूरशी काहीही संबंध नाही, त्यांनी मणीपूरसाठी काहीच केलेलं नाही. असं असूनही त्यांच्या जयंतीनिमित्त मणिपूरमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय, कारण मुख्यमंत्री बीरेन सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसच्या हातातील बाहुले आहेत’ अशी घणाघाती टीका त्यांनी केली असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्याबाबत अवमानकारक शब्दांचा वापर केला होता असंही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -