Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश भ्रष्टाचार प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलाला हायकोर्टाची नोटीस

भ्रष्टाचार प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलाला हायकोर्टाची नोटीस

कर्नाटकचे माजी मंत्री एस टी सोमशेखर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांना देखील कर्नाटक उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्रीपदाची खूर्ची जाताच कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस. येडियुरप्पा यांच्या अडचणी सुरु झाल्या आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाने बीएस येडियुरप्पा यांना भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात नोटीस पाठवली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, त्यांचे पुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बी वाय विजयेंद्र, त्यांचे कुटुंबीय, माजी मंत्री एस टी सोमशेखर आणि आयएएस अधिकारी यांना गृहनिर्माण प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे.

सामाजिक कार्यकर्ते टीजे अब्राहम यांनी या प्रकरणात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस सुनील दत्त यादव यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने या सर्वांच्या विरोधात नोटिसा बजावण्याचे निर्देश दिले. या वर्षी ८ जुलै रोजी विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशाला याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. विशेष न्यायालयाने तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि तत्कालीन मंत्री सोमशेखर यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी मागणारी याचिका फेटाळली होती. हे प्रकरण बेंगळुरू विकास प्राधिकरणाच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी कथितरित्या लाच घेण्याशी संबंधित आहे. जेव्हा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आणि काही गंभीर आरोप केले तेव्हा या विषयावर कर्नाटक विधानसभेतही चर्चा झाली होती. त्यावेळी, येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलाने हे आरोप फेटाळले आहेत.

- Advertisement -

बंगळुरूमध्ये ६६२ कोटी रुपये खर्च करून अपार्टमेंट बांधण्याशी संबंधित हे प्रकरण आहे. यापूर्वी, अनेक काँग्रेस नेत्यांनी येडियुरप्पा, त्यांचा मुलगा, जावई आणि जवळचे नातेवाईकांनी या प्रकल्पात भ्रष्टाचार तसंच लाच घेतल्याचे आरोप केले होते. कोलकात्यातील एका बनावट कंपनीमार्फत लाच मागितली गेली आणि पैसे दिले गेले असा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही वेळोवेळी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी बीएस येडियुरप्पा यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गेली. बसवराज बोम्मई यांनी २८ जुलै रोजी कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. २६ जुलै २०१९ रोजी काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडल्यानंतर बीएस येडियुरप्पा चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण आता कर्नाटकात मुख्यमंत्री बदलल्यानंतर बीएस येडियुरप्पा यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -